Raksha Khadse  Pudhari
जळगाव

Jalgaon News | रेल्वे, वीज विभागाच्या कारभारावर रक्षा खडसेंचा ‘रुद्रावतार’; वरणगावच्या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना झापले

Raksha Khadse Angry on Officials | केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा 'दिशा बैठकी'त आक्रमक पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

Raksha Khadse on Varangaon Railway Issues

जळगाव : जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत सोमवारी (दि.२३) केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. कामचुकार अधिकारी आणि प्रोटोकॉल धाब्यावर बसवणाऱ्या वीज व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची खडसे यांनी अक्षरशः ‘छपाई’ केली. “केंद्राचा ६० टक्के निधी असताना खासदारांना अंधारात ठेवून आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?” अशा शब्दांत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर वरणगावच्या पुलाच्या प्रश्नावरून रेल्वे इंजिनिअर्सना “दुसऱ्या देशात तपासणी करताय का?” असा खोचक सवाल करत कडक कानउघडणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महापौर, उपमहापौर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वेच्या ‘डिझाईन’मध्येच दोष; मंत्र्यांचा संताप

गेल्या तीन वर्षांपासून पिंपळगाव आणि वरणगावच्या रेल्वे गेटचा प्रश्न सुटत नसल्याने रक्षा खडसे कमालीच्या संतापल्या होत्या. तपासणीच्या नावाखाली किती वेळ घालवणार? असा सवाल करत त्यांनी रेल्वेच्या इंजिनिअर्सना धारेवर धरले. “तुमच्या डिझाईनमध्येच दोष आहे. जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर ते जमिनी देणार नाहीत. वेळ पडल्यास आम्ही स्वतः शेतकऱ्यांना सांगू की ते गेट तोडून टाका,” असा इशाराच त्यांनी दिला. रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छतेवरूनही त्यांनी व्यवस्थापनाचे वाभाडे काढले.

६० टक्के आमचा निधी

वीज विभागाच्या कामकाजावर बोलताना रक्षा खडसे यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात ११७ पैकी ७३ उपकेंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच्या उद्घाटनाची साधी सूचनाही खासदारांना दिली जात नाही. “आमदारांच्या मुलीकडून सबस्टेशनचे उद्घाटन केले जाते, हे चुकीचे आहे. केंद्राचा ६० टक्के निधी असलेल्या योजनांमध्ये खासदारांना डावलले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. इथून पुढे आमदार आणि खासदार यांच्या तारखा घेऊनच कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

एअरपोर्ट रस्ता

एअरपोर्ट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता आणि ब्रिजच्या कामाला होणाऱ्या विलंबावरही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ४ किलोमीटरच्या रस्त्याला ६ महिने का लागतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एअरपोर्ट ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या पथदीपांसाठी (लाईट्स) येणारा ५ कोटींचा खर्च जिल्हा परिषद आणि मनपा यांनी डीपी मधून मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस!

बैठकीला दांडी मारणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह 'न्हाई'चे (NHAI) उपसंचालक साळुंखे यांच्या अनुपस्थितीची खडसे यांनी गंभीर दखल घेतली. या अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT