नरेंद्र पाटील
जळगाव: रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखण्यात आलेली ‘पिवळी रेषा’ ही केवळ एक खूण नसून, ती प्रवाशांच्या जीवाचे रक्षण करणारी लक्ष्मणरेषा आहे. मात्र, भुसावळ रेल्वे स्थानकावर केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण सुरक्षा नियमांना हरताळ फासला जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
प्लॅटफॉर्मवरील सुरक्षित अंतराच्या मर्यादेत प्रवाशांशिवाय इतर कोणालाही, विशेषतः विक्रेत्यांना उभे राहण्यास सक्त मनाई असतानाही, भुसावळ स्थानकावर विक्रेते थेट पिवळ्या रेषेच्या पुढे जाऊन बिनधास्त विक्री करत आहेत. सुरक्षित अंतर ही रेषा धावत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी आखलेली असते.
या पिवळ्या रेषेवर उंच-सखल ठिपके किंवा रेषा असतात, ज्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींना काठीने किंवा पायाच्या स्पर्शाने प्लॅटफॉर्मचा शेवट जवळ आल्याची पूर्वकल्पना मिळते. वेगात जाणाऱ्या ट्रेनमुळे तिच्या आजूबाजूला हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. रेषेच्या आत उभे राहिल्याने प्रवासी ट्रेनच्या बाजूने ओढले जाण्याचा किंवा तोल जाऊन पडण्याचा धोका टळतो.
ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वी किंवा न थांबता वेगाने जात असताना या रेषेच्या पुढे उभे राहणे अत्यंत धोकादायक आहे. ट्रेनच्या बाहेर आलेले भाग, दरवाजाजवळची गर्दी किंवा हातातील वस्तू ट्रेनला धडकून अपघात होऊ शकतो.प्लॅटफॉर्मवरील पिवळी रेषा ओलांडून उभं राहणे किंवा ट्रेन येताना रेषेच्या पुढे जाणे हा रेल्वे नियमांनुसार सुरक्षेचा भंग मानला जातो. ट्रेन पूर्णपणे थांबल्याशिवाय नेहमी या पिवळ्या रेषेच्या मागेच उभे राहावे.
“या प्रकरणाची तातडीने दखल घेतली जाईल. मी माझ्या अधिकारी व सहकाऱ्यांसोबत मिळून स्थानकावरील विक्रेत्यांचे कौन्सिलिंग करेन. पिवळी रेषा ओलांडणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, तसेच उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”— चित्रेन्द्र जोशी (कमांडर, रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ विभाग)