ट्रॅव्हल तपासणी Pudhari News Network
जळगाव

जळगाव : ट्रॅव्हलच्या तपासणीवर पोलीस, आरटीओवर प्रश्नचिन्ह

भुसावळमध्ये कर्मचाऱ्यानं गावठी कट्ट्याने संपवली जीवनयात्रा; सुरक्षेवर गंभीर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातून मुंबई, पुणे, इंदूर, नागपूर आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी ट्रॅव्हलमार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांसोबतच ट्रॅव्हलद्वारे पार्सल पाठवण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, या प्रवासादरम्यान नेमकं कोणतं सामान ट्रॅव्हलच्या डिक्कीतून जातं, याची कोणतीही अधिकृत तपासणी होताना दिसत नाही. त्यामुळे ट्रॅव्हलमधून होणाऱ्या अवैध वाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

नुकताच भुसावळ येथे एका ट्रॅव्हलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने गावठी कट्ट्याने गोळी झाडून जीवनयात्रा संपवली. विशेष म्हणजे, जीवनयात्रा संपवण्याच्या एक दिवस आधी तो मध्य प्रदेशातून परत आला होता. त्यामुळे त्याने गावठी कट्टा तिथून आणला का, हा संशय निर्माण झाला आहे. जर कट्टा मध्य प्रदेशातून आणला नसेल, तर भुसावळसारख्या शहरात तो कसा उपलब्ध झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भुसावळमधून यापूर्वीही अनेकदा गावठी कट्टे जप्त करण्यात आले आहेत, मात्र या अवैध शस्त्रसाठ्याच्या मुळाशी असलेला सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. ट्रॅव्हलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे अशाप्रकारचा कट्टा आढळणं आणि त्यातून जीवनयात्रा संपवण्या सारख्या घटना घडणं, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

या प्रकरणामुळे ट्रॅव्हलच्या माध्यमातून होणाऱ्या पार्सलच्या तपासणीबाबत पोलीस आणि आरटीओ विभागाची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ट्रॅव्हल कंपन्यांद्वारे नेले जाणारे पार्सल, सामान, यावर कोणतीही ठोस सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याने भविष्यात यामुळे आणखी गंभीर घटना घडू शकतात. सध्याच्या युद्धजन्य स्थितीत देशातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अशा दुर्लक्षामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ ट्रॅव्हल तपासणी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT