जळगाव : चोपडा शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने अनैतिक मानवी व्यापाराविरोधात धडक कारवाई करत शहरातील एका ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ३, ४, ५ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २९ रोजी सायंकाळी सुमारे ६.४० वाजता चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महिलांना आर्थिक फायद्यासाठी आश्रय देऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
शिल्पा राजू लामा (वय : ३५ ), पूजा टीकाराम थापा (वय : २९ वर्षे), शिवाजी भिमराव पाटील, फरीद कबीर शेख, शाहबद वाहिद खान, शरिफ सत्तार तडवी, बाबू उर्फ जितेंद्र बाबूराव वाघे, फिरोजी हंसा खान, बाबू उर्फ जितेंद्र श्रावण वाघे, संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील, सुरेंद्र राजपूत सर्वजण रा. चोपडा (जि. जळगाव) या आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली. पीडित महिला राजस्थान व नेपाळ येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्यांना संरक्षण व आवश्यक मदत पुरविण्याची कार्यवाही सुरू आहे.
पोलिसांनी आरोपी क्रमांक १ व २ यांना ताब्यात घेतले असून आरोपी क्रमांक ३ ते ११ हे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.