जळगाव

Jalgaon Politics नाशिकपाठोपाठ जळगावचाही तिढा सुटला! शिंदेंच्या भेटीनंतर बंडखोर रेश्मा काळेंची माघार; आता तिरंगी लढत

भाजपच्या ‘संकटमोचकां’नी ही बंडखोरी शमवण्यासाठी आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले होते

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा विधान परिषद निवडणुकीतील राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आले आहे. भाजप उमेदवारासमोर शिंदे सेनेच्या उमेदवार रेश्मा काळे यांनी उभे केलेले मोठे आव्हान आता संपुष्टात आले असून, त्यांनी आपली बंडखोरी मागे घेतली आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हा तिढा सुटला असून, याबाबतची अधिकृत घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील करणार आहेत.

असा सुटला जळगावचा तिढा

जळगाव जिल्ह्यात भाजप अंतर्गत उमेदवाराच्या नावावरून राजकारण सुरू असतानाच, केंद्रातून अनपेक्षित नाव जाहीर झाल्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला होता. याच वातावरणात शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली होती. भाजपच्या ‘संकटमोचकां’नी ही बंडखोरी शमवण्यासाठी आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले होते.

नाशिकचा राजकीय तिढा सुटल्यानंतर जळगावचाही प्रश्न सुटेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. नाशिकचा तिढा सुटताच लागलीच महायुतीची पहिली बैठक बोलावण्यात आली. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या तातडीच्या बैठकीसाठी मुंबईला जावे लागल्याने या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर १२ तारखेला शिवसेनेच्या बंडखोर नेत्या व अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बंडखोरीवर पूर्णविराम मिळाला.

'साहेबांचा आदेश शिरसावंद्य'

या घडामोडींनंतर महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "साहेबांनी (एकनाथ शिंदे) आदेश दिला आहे, त्यामुळे पाठिंबा म्हणजे पाठिंबा! नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवाराने माघार घेतली, त्याच धर्तीवर जळगावात आपली माघार असेल. याबाबतची अधिकृत घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील करतील."

निवडणुकीत आता तिरंगी लढत स्पष्ट

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपून गेली असली, तरी रेश्मा काळे यांनी जाहीर माघार घेतली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्यांचे नाव रिंगणात राहणार असले, तरी त्यांची आणि शिंदे सेनेची संपूर्ण ताकद आता महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. रेश्मा काळे यांच्या माघारीमुळे आता जळगाव विधान परिषदेचा मुकाबला तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात महायुतीचे नंदकिशोर महाजन, महाविकास आघाडीचे शरद तायडे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यात थेट लढत रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT