जळगाव : जिल्ह्यातील 18 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) फूट स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्यात मात्र एकत्र असलेले हे पक्ष जळगाव जिल्ह्यात मात्र स्थानिक नेत्यांच्या सोयीप्रमाणे युती करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेत्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
काही ठिकाणी युती राखली असली तरी अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने स्वतंत्रपणे उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील राजकारण हे स्थानिक आमदार व माजी मंत्र्यांच्या प्रभावक्षेत्राभोवती फिरताना दिसत असून, अनेकांनी आपआपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने घराणेशाहीचा ठळकपणे दिसून येत आहे.
भुसावळमध्ये महायुती असूनही नगराध्यक्ष पदावरून घटक पक्षांमध्ये तणाव आहे. भाजपला राखीव जागेसाठी उमेदवार न मिळाल्याने स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिली. शिवसेनेने युती टिकवली असली तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार (तुतारी) गटानेही उमेदवारी दिल्याने ही लढत अधिक रंजक बनली आहे. लेवा पाटील, मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत अर्ज दाखल झाले.
मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेना-शिंदे गट आमनेसामने आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) मागे हटल्याने थेट द्वंद्व उभे राहिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून भाजपची मोहीम नेतृत्वात आहे, तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलगी मैदानात उतरली आहे. खडसे कुटुंबाला समर्थन मिळणार की पाटील यांच्या पक्षाने नव्या पिढीला साथ मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी पुन्हा रिंगणात असून भाजप त्यांच्या विजयी प्रयत्नात आहे. महाविकास आघाडीने ज्योत्स्ना विसपुते यांना उमेदवारी दिली आहे.
चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी विकासकामांच्या बळावर पत्नीला उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध पद्मजा राजीव देशमुख आणि राष्ट्रवादीच्या समाधान पाटील यांनी जोरदार लढत उभी केली आहे.
एकूण चित्र पाहता जळगाव जिल्ह्यातील निवडणुकीत महायुती फक्त नावालाच उरली आहे. स्थानिक राजकारण, वैयक्तिक सोय, कुटुंबीयांची नामनिर्देशने आणि कार्यकर्त्यांच्या नावावर निर्णय घेणे हेच महायुतीतील अनेक नेत्यांचे धोरण ठरले असल्याचे दिसते.
पक्षनिहाय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार – 18 नगरपरिषद
भुसावळ नगरपरिषद
भाजप–शिंदे: रजनी संजय सावकारे
राष्ट्रवादी (ठाकरे गट): गायत्री चेतन भंगाळे
राष्ट्रवादी (अजित पवार गट): अर्शिया अन्सारी
काँग्रेस: सविता प्रवीण सुरवाडे
जामनेर नगरपरिषद
भाजप: साधना गिरीश महाजन
महाविकास आघाडी: ज्योत्स्ना विसपुते
चाळीसगाव नगरपरिषद
भाजप: प्रतिभा मंगेश चव्हाण
महाविकास आघाडी: पद्मजा राजीव देशमुख
राष्ट्रवादी (अजित पवार): समाधान पाटील
पाचोरा नगरपरिषद
शिवसेना शिंदे: सुनिता किशोर पाटील
भाजप: सुजेता दिलीप वाघ
चोपडा नगरपरिषद
शिवसेना शिंदे/काँग्रेस: नम्रता सचिन पाटील
भाजप/राष्ट्रवादी अप: साधना नितीन चौधरी
शिवसेना ठाकरे: रोहिणी प्रकाश पाटील
वरणगाव नगरपरिषद
शिवसेना शिंदे: तृप्ता समाधान महाजन
भाजप: शामल झांबरे
महाविकास आघाडी: राजेंद्र चौधरी
धरणगाव नगरपरिषद
महायुती: वैशाली विनय भावे
महाविकास आघाडी: लिलाबाई सुरेश चौधरी
यावल नगरपरिषद
महाविकास आघाडी: छाया पाटील
शिवसेना शिंदे: स्वाती मनोहर पाटील
नशिराबाद नगरपरिषद
भाजप/शिंदे: योगेश पाटील
राष्ट्रवादी अजित पवार: गणेश चव्हाण
शिवसेना ठाकरे: राजू रोटे
अमळनेर नगरपरिषद
शिवसेना शिंदे: डॉ. परीक्षित बाविस्कर
शहर विकास आघाडी: जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर
एरंडोल नगरपरिषद
भाजप/शिंदे: डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर
राष्ट्रवादी अजित पवार: गायत्री दीपक पाटील
शिवसेना ठाकरे: रघुनाथ ठाकूर
पारोळा नगरपरिषद
भाजप/शिंदे: चंद्रकांत पाटील
शिवसेना ठाकरे/राष्ट्रवादी अप: अंजली करण पवार
फैजपूर नगरपरिषद
भाजप: दामिनी पवन सराफ
काँग्रेस: नीलिमा केतन किरंगे
राष्ट्रवादी अजित पवार: सुमय्या शेख कुरबान
सावदा नगरपरिषद
भाजप/शिंदे: रेणुका राजेंद्र पाटील
राष्ट्रवादी अजित पवार: सुभद्राबाई बडगे
भडगाव नगरपरिषद
भाजप: सुशीला शांताराम पाटील
शिवसेना शिंदे: समीक्षा लालचंद पाटील
रावेर नगरपरिषद
भाजप: संगीता भास्कर महाजन
शिवसेना ठाकरे: रवींद्र मनीषा पवार
मुक्ताईनगर नगरपंचायत
भाजप: भावना ललित महाजन
शिवसेना शिंदे: संजना चंद्रकांत पाटील (फॉर्म A), भारती छोटू भोई (फॉर्म B)
शेंदुर्णी नगरपंचायत
भाजप: गोविंद अग्रवाल
राष्ट्रवादी शरद पवार: उज्वला सतीश काशीद