जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात सामील होण्यासाठी तरुणाईचा कस लागत असून, गुरुवारी (१२ फेब्रुवारी) झालेल्या मैदानी चाचणीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. १७१ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या या 'महाभरती'त आज बोलावलेल्या १००० उमेदवारांपैकी ७४८ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानात हजेरी लावली.
त्यापैकी केवळ ३८० जणांनीच मैदानी चाचणीची भिंत ओलांडली आहे. उर्वरित २९५ जणांना मैदानावर घाम गाळूनही अपात्रतेचा धक्का सहन करावा लागला, तर ७३ जण शारीरिक मोजमापातच बाद झाले.
पहाटे 5 पासूनच 'मैदान' गाजलं
पोलीस शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. दररोज सकाळी ५ वाजेपासूनच भरती प्रक्रियेला सुरुवात होत असून, कडाक्याच्या थंडीतही उमेदवारांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मात्र, पोलिसांची ही चाचणी केवळ उत्साहाची नसून ती कडक शिस्त आणि शारीरिक क्षमतेची असल्याचे आजच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
आकडेवारी काय सांगते? (१२ फेब्रुवारीचा लेखाजोखा) आजच्या चाचणीसाठी प्रशासनाने एकूण १००० उमेदवारांना पाचारण केले होते. त्यापैकी ७४८ उमेदवारांनी प्रत्यक्ष मैदानात हजेरी लावली. बायोमेट्रिक आणि इतर तांत्रिक तपासणीनंतर प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली.
शारीरिक मोजमाप: उपस्थित ७४८ पैकी ७३ उमेदवार उंची किंवा छातीच्या मोजमापाच्या निकषात बसू शकले नाहीत.
मैदानी चाचणी: पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी २९५ जणांना धावणे, गोळाफेक यांसारख्या मैदानी प्रकारांत अपेक्षित गुण मिळवता आले नाहीत.
अंतिम यश: सर्व निकष पूर्ण करत ३८० उमेदवारांनी आजची 'जंग' जिंकली असून ते पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.
पारदर्शकतेचा 'खडा' पहारा भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. कोणत्याही अफवांना बळी न पडता केवळ स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
वर्दी मिळवण्यासाठी मैदानात उतरलेल्या ७४८ पैकी ३८० उमेदवारांनी 'पास'चा शिक्का मिळवला असला, तरी २९५ उमेदवारांना सरावाच्या अभावामुळे काढता पाय घ्यावा लागला. १७१ जागांसाठी असलेली ही चुरस आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.