जळगाव : जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलखान्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ३० एप्रिल ते २ मे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात आली. या तीन दिवसांच्या धडक कारवाईत तब्बल ६१ लाख ३३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करत २४ गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमासह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२५ अन्वये कडक कारवाई करण्यात आली. धरणगाव, यावल, शनिपेठ, रावेर, चाळीसगाव, मेहुणबारे, एमआयडीसी, एरंडोल आणि चोपडा या भागात पोलिसांनी छापे टाकून २५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले.
या कारवाईत १४ वाहने (किंमत ४६,लाख १० हजार रुपये) व ४६३ किलो (अवैध गोमांस) जप्त करण्यात आले व ७८ (गायी, बैल, गोऱ्हे व म्हशी) गोवंशाची सुटका करण्यात आली. असा एकूण ६१ लाख ३३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव विभाग) आणि संदीप गावीत (जळगाव विभाग) यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गोवंश तस्करांच्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.