Paldhi Tarsod Bypass Container Overturns Pudhari
जळगाव

Jalgaon Accident | पाळधी-तरसोद बायपासवर कंटेनर उलटला: ५ वाहने एकमेकांवर धडकली; गाड्यांचा चक्काचूर, काचांचा खच

न्हाईच्या (NHAI) अंधारामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

पुढारी वृत्तसेवा

Paldhi Tarsod Bypass Container Overturns

जळगाव : जळगावच्या पाळधी-तरसोद या नवीन बायपास महामार्गावर गुरुवारी रात्री भीषण अपघाताची मालिका घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कंटेनर महामार्गावर आडवा झाला आणि मागून येणारी पाच वाहने एकमेकांवर आदळली. या थरारक अपघातात दोन कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मात्र, या अपघाताने 'न्हाई'च्या (NHAI) हलगर्जीपणाचा आणि अंधेरनगरी कारभाराचा बुरखा फाडला आहे.

थरार... अन् गाड्यांचा खच!

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी-तरसोद बायपासवर एका भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो महामार्गाच्या मध्यभागी उलटला. अंधार असल्याने मागून येणाऱ्या वाहनचालकांना हा कंटेनर उशिरा दिसला. उलटलेल्या कंटेनरला धडक देण्यापासून वाचवण्यासाठी चालकांनी ब्रेक लावले, मात्र मागून येणारे दोन अवजड ट्रक आणि तीन कार एकमेकांवर जोरात आदळल्या. या धडकेत कारच्या काचा फुटून पत्र्याचा अक्षरशः गोळा झाला आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच मोठी जमेची बाजू ठरली.

'न्हाई'चे अभियंते झोपलेत का?

या महामार्गावर अपघात झाला त्या ठिकाणी एकही पथदिवा सुरू नव्हता. कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेल्या बायपासवर 'न्हाई'ने पथदिवे का लावले नाहीत? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, महामार्गाचे सुरक्षा दुभाजक (Divider) अनेक ठिकाणी तोडलेले आहेत. जर हायवेवर पेट्रोलिंग (गस्त) सुरू असते, तर मग हे तोडलेले दुभाजक अधिकाऱ्यांना दिसत का नाहीत? असा संतप्त सवाल वाहनधारकांनी विचारला आहे.

जबाबदारी झटकणारे 'अजब' उत्तर!

या प्रकरणी न्हाई (तरसोद ते फागणे) बायपासचे अभियंता दिग्विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अत्यंत बेजबाबदार उत्तर दिले. "आमचे लाईट आहेत, मात्र लाईट गेली असेल तर सांगता येत नाही," असे म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. जर एखाद्याचा बळी गेला असता, तर हेच 'लाईट गेली असेल' हे उत्तर चालले असते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ओव्हरटेकचा प्रयत्न नडला!

पाळधी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी प्रशांत कडारे यांनी सांगितले की, रात्री महामार्ग पोलीस आणि पाळधी ओपीचे कर्मचारी घटनास्थळी हजर होते. प्राथमिक अंदाजानुसार, एका गाडीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा विचित्र अपघात घडला. यामध्ये ओव्हरटेक करणारा चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT