ATM Robbery Attempt Jalgaon Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम चोरीचा प्रयत्न उधळला; 8.89 लाखांची रोकड सुरक्षित

जारगाव येथील एसबीआयच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

ATM Robbery Attempt Jalgaon

जळगाव : पाचोरा पोलिसांच्या तत्परतेमुळे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. जारगाव येथील एसबीआयच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने एटीएममधील तब्बल 8 लाख 89 हजार 700 रुपये सुरक्षित राहिले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील जारगाव येथील सारोळा रोडवरील एसबीआय एटीएममध्ये काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक कुमार पवार यांनी तातडीने पोलीस कर्मचारी हरीश अहिरे आणि पोशी बंजारा यांना घटनास्थळी रवाना केले. तेथे पोहोचल्यानंतर एटीएममधील रोख रक्कम असलेले कॅबिनेट काळ्या रंगाच्या (एमएच 40 सीएस 7028) कारमध्ये चढविण्याच्या तयारीत तीन संशयित तरुण असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी वाहनासह तारखेडा दिशेने पलायन केले. त्यानंतर पाचोरा पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू करत धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत धाव घेतली. संशयितांचा माग काढण्यासाठी विविध टोल नाके, धुळे पोलिस तसेच मध्य प्रदेशातील नियंत्रण कक्षांना वाहनाची माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित एटीएममध्ये 8 लाख 89 हजार 700 रुपयांची रोकड असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले असून चोरीचा डाव पूर्णपणे उधळून लावण्यात आला.

विशेष बाब म्हणजे, घटना घडल्यानंतर बराच वेळ उलटूनही एसबीआयच्या एटीएमशी संबंधित तांत्रिक कर्मचारी आणि अन्य जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT