Jalgaon News Pudhari News Network
जळगाव

Jalgaon News | ‘यापुढे प्रत्येक निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार’; भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा

१५ वर्षांच्या राजकीय अनुभवात अनेकदा माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी महायुतीतील घडामोडींवर भाष्य करत भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचा घात होणार असल्याची पूर्वकल्पना असल्याने जळगावमध्ये पक्षाकडून खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा भाजपावर विश्वास असल्याने कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे फॉर्म मागे घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, असे पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, “आम्ही प्रामाणिकपणे दोन्ही फॉर्म मागे घेतले आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. इतकेच नव्हे तर दुसऱ्या पसंतीचे मतदेखील अन्य कोणालाही दिले नाही. मात्र, नाशिकमध्ये शिवसेनेचा घात झाला. त्यामुळे आता मी स्वतंत्र आहे आणि यापुढील कोणतीही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे.”

पाटील यांनी पुढे सांगितले की, “माझ्या १५ वर्षांच्या राजकीय अनुभवात अनेकदा माझ्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. ‘जो सावध असतो तोच वाचतो, जो बेसावध असतो तो जातो,’ हेच वास्तव आहे.”

महायुतीतील सहकार्याबाबत बोलताना ते म्हणाले, “जळगावमध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला. त्याचाच परिणाम म्हणून महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले.” किशोर पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT