जळगाव

Cloudburst heavy rain jalgaon: पारोळ्यात ढगफुटीसदृश पाऊस! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बोरी-गिरणा धरणे ओव्हरफ्लोच्या मार्गावर; दोन्ही धरणांचे दरवाजे उघडले

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पारोळा तालुक्यासह चाळीसगाव परिसरात आज धुवांधार पावसाने अक्षरशः तांडव घातले आहे. पारोळा मंडळात सरासरी १३४.६ मि.मी. असा अतिवृष्टीचा पाऊस नोंदवला गेला असून बोरी आणि गिरणा या दोन्ही मोठ्या प्रकल्पांमध्ये पाण्याचा अफाट प्रवाह सुरू झाला आहे. वाढती आवक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून बोरी धरणाचे २ आणि गिरणा धरणाचे २ दरवाजे उघडून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने दोन्ही नद्यांच्या काठच्या गावांना तातडीचा आणि हाय अलर्ट जारी केला आहे.

पारोळ्यात जलप्रलय; बहादुरपूरमध्ये १५५ मि.मी. पाऊस

आज (३१ जुलै) पारोळा तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केले. बहादुरपूर मंडळात तब्बल १५५ मि.मी., तर तामसवाडीत १३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पारोळा (१२२ मि.मी.), शेळावे (१२० मि.मी.) आणि चोरवाड (११० मि.मी.) या सर्वच मंडळांत धुवांधार पाऊस झाल्याने ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तालुक्यात एकाच दिवसात तब्बल ६७३ मि.मी. (सरासरी १३४.६ मि.मी.) पावसाची नोंद झाली असून एकूण पावसाचा आकडा ३१९.१२ मि.मी. वर पोहोचला आहे.

धरणे 'फुल्ल'; बोरी आणि गिरणाचे दरवाजे उघडले

मुसळधार पावसामुळे जलप्रकल्पांमधील पाण्याचा साठा वेगाने वाढला आहे:

  • बोरी मध्यम प्रकल्प : सकाळी ११:३० वाजेच्या अहवालानुसार धरणाची पाणीपातळी २६५.०० मीटरवर पोहोचली असून जिवंत साठा ९.९३ दलघमी (३९.४७%) झाला आहे. मात्र, धरणात तब्बल १०,००० ते १५,००० क्युसेक्सची प्रचंड आवक सुरू झाल्याने दुपारी १:०० वाजता बोरी धरणाचे २ दरवाजे ०.३ मीटरने उघडण्यात आले.

  • गिरणा मोठा प्रकल्प : चाळीसगाव उपविभागांतर्गत येणाऱ्या गिरणा धरणातही पाण्याची आवक वाढल्याने दुपारी २:०० वाजता धरणाचे वक्रद्वार क्र. १ आणि ६ प्रत्येकी ३० सेमीने उघडून २४७६ क्युसेक्स (७०.०७ क्युमेक्स) विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

प्रशासनाचा 'हाय अलर्ट'

धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे बोरी आणि गिरणा नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी तसेच गुराढोरांना सुरक्षित स्थळी हलवावे, असा इशारा पाटबंधारे उपविभाग (चाळीसगाव) आणि स्थानिक प्रशासनाने दिला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग पाहून विसर्ग कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT