जळगाव : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांना, “नाथाभाऊ, संधी मिळाली तर दिल्लीला एकत्र जाऊ, दिल्लीच्या सत्तेची मिठाई खाऊ,” असा सल्ला दिला. त्यांच्या या फटकेबाजीने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आयोजित सोहळ्यात पक्ष-प्रतिपक्षाच्या सीमा ओलांडून दिग्गज नेत्यांचा महाकुंभ भरल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले, जयंत पाटील (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप), दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, महादेव जानकर, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, रोहिणी खडसे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला प्रमुख उपस्थित होते. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विशेष संदेश याप्रसंगी ऐकवण्यात आला.
विरोधी पक्षनेता ते सत्ताधारी मंत्री असा नाथाभाऊंचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. सभागृहातील त्यांची आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती अतुलनीय असल्याचे उद्गार उपस्थितांनी काढले.
नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी कवितेच्या फैरी झाडत उपस्थितांची मने जिंकली.
“शरद पवार व खडसे यांच्याशी अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत,
सर्व पक्षाच्या लोकांशी दोस्ती करणे हा माझा छंद आहे...
नाथाभाऊ संधी मिळाली तर दिल्लीला एकत्र जाऊ, दिल्लीच्या सत्तेची मिठाई खाऊ,
बऱ्याच वर्षांनंतर आलोय नाथाभाऊ-पवार तुमच्या घरात,
पण नरेंद्र मोदी माझ्यासोबत आहेत जोरात!”
या तुफान फटकेबाजीने सभागृहात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. नाथाभाऊंच्या या वाढदिवस सोहळ्याने जळगावच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा घडवून आणली आहे.
दिग्गज नेत्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे
बाळासाहेब थोरात :
“नाथाभाऊंनी ‘तापी खोरे झालेच पाहिजे’ यासाठी केलेला संघर्ष मी जवळून पाहिला आहे. सलग आठ मिनिटांच्या भाषणात एकही शब्द न पुनरावृत्ती करता मुद्द्यासहित मांडणी करणारा हा जनसामान्यांचा नेता आहे.”
दिलीप वळसे-पाटील :
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा हा माणूस! पक्ष आणि जळगाव जिल्ह्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. दुर्दैवाने काही वेळा आपल्याच आप्तस्वकीयांमुळे त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले.”
जयंत पाटील (शेकाप) :
“खडसे आणि मुंडे यांनी बहुजनांचे राजकारण पुढे नेण्यासाठी ताकद पणाला लावली. विधान परिषदेतील नाथाभाऊंचे योगदान आणि कामकाज कोणीही पुसू शकणार नाही.”
जयंत पाटील (राष्ट्रवादी) :
“जलसंपदा मंत्री असताना त्यांनी अशक्य वाटणाऱ्या योजना पूर्ण केल्या. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना ते नेहमीच आक्रमक असतात. राजकीय जीवनात मतभेद झाले, पण स्वबळावर प्रवास करत त्यांनी राष्ट्रवादीतही ठसा उमटवला. शरीर व्याधींनी घेरले असले तरी नाथाभाऊंची हिम्मत अजूनही वाघासारखीच आहे.”