जळगाव: जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया (दि.10) पासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १८ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी ही निवडणूक होत असून, अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर अशी ठेवण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. याच अर्जासह जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित १७ नगरपालिका जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल आदी येथे पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने पहिला दिवस निरंक गेला. त्यामुळे सुरुवातीला उमेदवारांमध्ये विशेष हालचाल दिसून आली नाही, असे प्रशासकीय सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.
एकूण संस्था: १८ (नगरपालिका व नगरपंचायती)
अर्ज दाखल करण्याची मुदत: १० ते १७ नोव्हेंबर
पहिल्या दिवशी दाखल अर्ज: १ (अमळनेर नगरसेवक पदासाठी)
अर्ज नसलेल्या नगरपालिका: १७
दरम्यान, पुढील काही दिवसांत उमेदवारांची अर्ज भरण्यास हालचाल वाढणार असून अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.