

डोंबिवली : दुबार नोंदी असलेल्या मतदारांच्या नावांमुळे मतदार याद्यांत झालेला घोळ महाराष्ट्रात सर्वत्र आढळून आला आहे. या घोळाला जबाबदार असलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी आव्हान दिले आहे.
या संदर्भात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पुराव्यांनिशी माहिती देऊन मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. वेगवेगळ्या इपिक क्रमांकावर एकाच व्यक्तीची नोंदींचा दाखले सादर करून निवेदनाद्वारे गौप्यस्फोट करून खळबळ उडवली आहे.
मनसेचे नेत्याच्या सूचनेनुसार मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ३२ हजार ३४५ दुबार मतदारांची नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात यावीत यासाठी मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक तथा डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत, विधानसभा सचिव अरूण जांभळे, उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, तुषार पाटील, उपशहराध्यक्ष प्रभाकर पाटील, शहर सचिव संदीप उर्फ रमा म्हात्रे, विभागाध्यक्ष देवेंद्र भगत, ऋतिकेश गवळी, विद्यार्थी सेनेचे हर्षल भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
१४४ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. दूबार मतदार नोंदींमुळे मतदान प्रक्रियेवर अतिरिक्त भार पडत असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील यादीचा भाग क्रमांक ३५२, ३५३, ३५४ आणि ३५५ या ४ याद्यांमध्ये दिव्यातील यांद्यामधील मतदार हेतुपुस्सर घुसडले असल्याचा गौप्यस्फोट निवेदनकर्त्यांनी केला आहे. ज्यांची दिवा (ठाणे) विभागात दोन ते पाच ठिकाणी नावे नोंदविली गेली आहेत, अशी एकूण १ हजार ४२३ नावांची नोंद आहे.
बऱ्याच मतदार याद्यांमध्ये मतदाराचा पत्ता नाही, तर काही ठिकाणी एकाच पत्त्यावर विविध जाती/धर्मांचे मतदार राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यावेळी एकाच इपिक क्रमांकाचा दुबार मतदार असेल तर एखाद्या वेळी मानवी चूक आहे असे समजू शकतो. परंतु वेगवेगळ्या इपिक क्रमांकावर एकाच व्यक्तीची नोंदणी होत असेल तर त्या सर्व नोंदण्या कुणाच्या तरी वैयक्तिक स्वार्थासाठी हेतूपुरस्सर केल्याचे आमच्या निदर्शनास येत असल्याचा आरोप मनसे नेत्याने निवेदनात केला आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण ३२ हजार ३४५ दुबार मतदारांची नावे आढळली असून त्यांची सविस्तर यादी या पत्रासोबत सादर करण्यात येत आहे. म्हणून भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित बीएलओ (BLO) यांच्यामार्फत या नावांची शहानिशा करुन दुबार नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात यावीत, अशी मागणी करत मनसे नेत्याने निवडणूक आयोगाला साकडे घातले आहे. जोपर्यंत याद्या निर्दोष होत नाहीत तोपर्यंत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत वापरात आणू नये, असेही आवाहन राजू पाटील यांनी केले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून मतदार याद्या शुद्ध व पारदर्शक करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशीही अपेक्षा मनसेचे राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जुन्या याद्यांचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. अशा याद्यांचा वापर झाल्यास निवडणूक यंत्रणा मनसेचा रोष ओढवून घेणार आहे. अशी वेळ येऊ नये यासाठी दुबार व बोगस मतदारांना रोखण्याकरिता निवडणूक आयोगाने आत्ताच योग्य ती पावले उचलावीत. अन्यथा राज ठाकरे यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशांनुसार येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यास येणाऱ्या बोगस मतदारांना रोखण्यासाठी मनसे आपल्या स्टाईलने संघर्ष करेल, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने दिला.