जळगाव

Jalgaon News | शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी देत खंडणीची मागणी, गटशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा

गणेश सोनवणे

जळगांव पुढारी वृत्तसेवा – शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी देत शाळेला मिळालेल्या शासकीय अनुदानातील ५ टक्के रक्कमेची खंडणी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मागितल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री १०.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील रा. अमळनेर यांनी अमळनेर तालुक्यातील जवखेड येथील शाळेबद्दल एका व्हॉटसॲपवर बदनामीकारक मजकूर टाकला होता. त्यामुळे शाळेचे लिपीक उमेश राजेंद्र पाटील यांनी अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे २७ मे रोजी अर्ज केलेला होता. त्याची नकल घेण्यासाठी उमेश पाटील व शाळेचे सहकारी अमळनेर पंचायत समिती कार्यालयात मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता गेले होते. त्यावेळी उमेश पाटील व सहकारी यांनी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांची भेट घेवून शाळेची बदनामी करून नका असे सांगितले. त्यावर रावसाहेब पाटील यांनी शिवीगाळ करून सन-२०१२ पासून तुमच्या शाळेतला जे शासकीय अनुदान मिळले आहे. त्याचेवर मला ५ टक्के दराने पैसे द्या नाहीतर तुमच्या शाळेची मान्यता रद्द करण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर उमेश पाटील व त्यांचे सहकारी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री १०.३० वाजता गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे करीत आहे.

हेही वाचा –

SCROLL FOR NEXT