जळगाव

Jalgaon News : भूमिपूजनाचा फुसका बार की भुसावळकरांच्या जखमेवर मीठ? अमृत-१ चे काम अधूनच, तरीही अमृत-२ ची कुदळ मारली

वर्षानुवर्षे रखडलेल्या योजनेमुळे जनतेचे हाल; पहिल्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव पाठवल्याची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

​जळगाव/भुसावळ: गेल्या सात ते आठ वर्षांपासून ताटकळत पडलेल्या 'अमृत टप्पा-१' योजनेतील ११ पैकी तब्बल १० टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आणि हस्तांतरित नसतानाच, भुसावळमध्ये आज 'अमृत टप्पा-२' च्या एका उर्वरित टाकीच्या कामाचा पुनःप्रारंभ करण्यात आला. यापूर्वीही उद्घाटन झालेल्या या टाकीचे काम मधल्या काळात रखडले होते.

अखेर आज वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती यांच्या उपस्थितीत कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, योजनेचा हा खेळखंडोबा पाहता भुसावळकरांना सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी अजून किमान १ वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माध्यमांशी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी अमृत-१ चे काम रखडवणाऱ्या संबंधित एजन्सीला ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत टाकण्याचा) प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली. मधल्या काळात झालेल्या सत्तांतरामुळे काम नक्की कोणत्या कारणाने थांबवले गेले होते हे माहीत नाही, परंतु आता हे थांबलेले काम पूर्ण करण्यासाठी जुन्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून नवीन टेंडर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सावकारे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे;

  • ठेकेदारावर वसुलीचा बडगा: जुन्या ठेकेदारावर कारवाई करून नवीन दरानुसार (New Estimate) टेंडर काढले जाईल आणि वाढीव खर्चाचा भुर्दंड संबंधित निष्काळजी ठेकेदाराकडूनच वसूल केला जाईल. ​

  • पाणी मिळायला १ वर्ष लागणार: शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी भुसावळच्या नागरिकांना अजून १ वर्षाचा कालावधी सोसावा लागणार आहे. ​

  • 'जल जीवन' आणि 'अमृत' वेगळे: जल जीवन मिशन आणि अमृत योजना हे दोन्ही भिन्न विषय आहेत. जल जीवन प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असून संपूर्ण महाराष्ट्रात नागरी संस्थांमध्ये केवळ भुसावळ नगरपालिकेला या योजनेचा विशेष लाभ मिळालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT