mobile tower  file photo
जळगाव

Jalgaon Nashirabad Diesel Theft |नशिराबाद परिसरात 'डिझेल चोरांचा' धुमाकूळ! दोन टॉवरवरून ४० हजारांचे ४५० लिटर डिझेल लंपास

भादली रेल्वे गेट व कडगाव रस्त्यावरील टॉवरवर डल्ला; नशिराबाद पोलिसांत अज्ञात भामट्यांवर दोन गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

​जळगाव: अज्ञात चोरांनी आता थेट मोबाईल टॉवरला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या दोन दिवसांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या जिओ टॉवरवरील जनरेटरमधून तब्बल ४० हजार ५०० रुपये किंमतीचे ४५० लिटर डिझेल लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिओ कंपनीचे सुपरवायझर विजय नगराज पाटील (वय ४९, रा. अथर्व कॉलनी, आशाबाबा नगर जवळ, जळगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पहिली घटना (कडगाव रस्ता):

२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास उड्डाणपुलाच्या खालील बाजूस, कडगाव रस्त्यावरील जिओ टॉवरच्या जनरेटरमधून चोरांनी २० हजार ७०० रुपये किमतीचे २३० लिटर डिझेल चोरून नेले (गु.र.नं. २५७/२०२६). या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करत आहेत.

​दुसरी घटना (भादली रेल्वे गेट):

४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान भादली रेल्वे गेट परिसरातील जिओ टॉवरवरून (टॉवर क्र. JLG-ENB-9008) अज्ञात चोरांनी १९ हजार ८०० रुपये किमतीचे २२० लिटर डिझेल लांबवले (गु.र.नं. २५६/२०२६). या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल देशमुख करत आहेत.

​दोन्ही घटनांमध्ये जनरेटरमधील डिझेल लबाडीने चोरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार अज्ञात चोराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अद्याप आरोपींचा सुगावा लागलेला नसून, भरवस्तीत आणि महामार्गालगतच्या टॉवरवर हात साफ करणाऱ्या या टोळीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान नशिराबाद पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT