जळगाव – जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली. सकाळची कडाक्याची थंडी असूनही काही भागात मतदारांनी लवकर मतदान करण्याला प्राधान्य दिले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सकाळी 7.30 ते 9.30 या पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी 6.01टक्के मतदान नोंदवले गेले आहे.
सुरुवातीच्या मतदानात यावल नगरपरिषदेत सर्वाधिक 10.87% मतदानाची नोंद झाली आहे. यावलमधील मतदारांनी सकाळपासून उत्साह दाखवल्याचे दिसून आले. त्यानंतर फैजपूरमध्ये 10.03% मतदान झाले असून या दोन्ही ठिकाणी मतदारांची चांगली गर्दी पाहायला मिळाली.
दुसरीकडे, पाचोरा नगरपरिषदेत केवळ 3.65% इतके अत्यल्प मतदान झाल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. भडगावमध्येही मतदानाचा वेग संथ असून तिथे 4.48% मतदान झाले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी मतदारसंख्या असलेल्या भुसावळ नगरपरिषदेत सकाळी ९.३० वाजेपर्यंत ५.१२% मतदान झाले. भुसावळमधील एकूण १,७८,७८० मतदारांपैकी ९,१६२ जणांनी मतदान केले आहे. अमळनेरमध्ये ५.५९%, तर चाळीसगावमध्ये ६.१९% मतदान झाले आहे.
सर्वाधिक मतदान:
यावल – १०.८७%
फैजपूर – १०.०३%
रावेर – ८.३१%
वरणगाव – ८.०८%
मध्यम मतदान असलेली शहरे:
जामनेर – ६.२९%
चाळीसगाव – ६.१९%
नशिराबाद – ६.२६%
अमळनेर – ५.५९%
चोपडा – ५.४७%
मुक्ताईनगर – ५.२०%
भुसावळ – ५.१२%
सर्वात कमी मतदान:
पाचोरा – ३.६५%
भडगाव – ४.४८%
जळगाव जिल्ह्यात या निवडणुकांसाठी ८,८१,५१० मतदार आहेत. सुरुवातीच्या दोन तासांत ५२,९७७ मतदारांनी मतदान केला असून त्यामध्ये ३०,४७९ पुरुष आणि २२,४९५ महिला मतदारांचा समावेश आहे.
दुपारपर्यंत तापमान वाढल्यानंतर मतदानाचा वेग वाढेल, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.
भुसावळ शहर संवेदनशील मानले जात असल्याने पोलिसांनी सकाळपासूनच सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी खडका रोडवरील संवेदनशील मतदान केंद्रांना भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. मतदान केंद्रांच्या परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून कोणताही अप्रीतिकर प्रकार होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बहुतेक मतदान केंद्रावर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडत आहे. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढू शकतो, असे प्रशासनाचे मत असून सर्वत्र कायदा-सुव्यवस्था सुरळीत आहे.