

सिन्नर ( नाशिक) : आमचा डीएनए विचारण्याची हिंमत करू नका. आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. 'वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजितो दात ही जात आमची, पहा चाळून पाने इतिहासाची', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर पलटवार केला.
सिन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. क्रीडामंत्री कोकाटे यांच्या भाजपचा डीएनए तपासा या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत वातावरण तापवले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाजप कुणावरही व्यक्तिगत टीका करत नाही; आम्ही फक्त विकासाची भाषा बोलतो. ज्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नसते, तेच लोक टीका-टिप्पणी करतात. आमच्याकडे नीती, नियम आणि विकासासाठी निधी आहे. जे बोलतो ते करून दाखवतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेलाही ठाम पाठिंबा दर्शविला. जोपर्यंत लाडक्या बहिणींचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे आश्वासन देत लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनविण्याची जबाबदारी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत वाजे यांनी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा उत्साहात पार पडली.