Jalgaon Muktainagar Police Raid Pudhari
जळगाव

Jalgaon Gutkha Seized | जळगावात मोठी कारवाई; प्रतिबंधित गुटख्यासह १२.०६ लाखांचा मुद्देमाल लंपास

मुक्ताईनगर पोलिसांकडून कार व मोबाईल जप्त, दोघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Muktainagar Police Raid

जळगाव : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, एक कार आणि दोन मोबाईल फोन जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी स्वाधीन करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मारुती सुझुकी अर्टिगा (क्र. एमएच-३० एझेड-४६६४) या वाहनातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात आहे.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनातून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

या कारवाईत ३ लाख ८६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, ८ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि २० हजार रुपये किमतीचे विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सय्यद आरिफ सय्यद हकीम (नदीम) (वय ३५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) तसेच खलील उल्ला खान (वय ३२, रा. शेगाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस ठाणे करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस नाईक हेमंत पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांच्या पथकाने पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT