Jalgaon mother-son electrocuted 
जळगाव

Jalgaon mother-son electrocuted| तुटलेली विद्युत तार बाजूला करताना तरुण चिकटला, वाचावायला गेलेल्या आईलाही बसला धक्का; मायलेकाचा मृत्यू

जळगावच्या आसोदा रोड परिसरातील हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : घराजवळ तुटून पडलेली विद्युत तार बाजूला करताना लागलेल्या विजेच्या धक्क्याने तरुणाचा, तर त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शहरातील प्रवीण मोहन टॉकीज परिसरातील आसोदा रोडवर घडली. राहुल सपकाळे (वय ३५) आणि सुनंदा सपकाळे अशी मृत मायलेकांची नावे आहेत. एकाच वेळी कुटुंबातील दोघांचा बळी गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात सपकाळे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळच एक विद्युत तार तुटून खाली पडली होती. ३५ वर्षीय राहुल सपकाळे यांनी ही तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते तारेला चिकटले. मुलगा विजेच्या प्रवाहात अडकल्याचे पाहताच, जवळच असलेल्या त्यांच्या आई सुनंदा सपकाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, राहुल यांना बाजूला करताना सुनंदा यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.

या घटनेत दोघेही गंभीररीत्या भाजून बेशुद्ध पडले. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांनाही जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

दरम्यान, राहत्या घराजवळ जिवंत विद्युत तार पडलेली असताना याकडे कुणाचेच लक्ष नाही. मायलेकांच्या एकाच वेळी झालेल्या मृत्यूमुळे सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT