पावसाची संततधार pudhari photo
जळगाव

Jalgaon Rain Updates | जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात पावसाची संततधार; काही मंडळांत जोरदार सरी

जळगाव तालुक्यात सर्वाधिक ३९.८ मिमी पाऊस; चाळीसगाव, पारोळ्यात अद्याप प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Monsoon Update

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने काही भागांत समाधानकारक हजेरी लावली आहे. १२ सप्टेंबरअखेर जिल्ह्यात सरासरी २१.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीच्या १७.७ टक्के आहे. जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये जोरदार सरी कोसळल्या असल्या, तरी चाळीसगाव आणि पारोळा तालुक्यांसह काही भागांत अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार, जळगाव तालुक्यात सर्वाधिक ३९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर जामनेरमध्ये २७.३ मिमी, बोदवडमध्ये २५.५ मिमी, एरंडोलमध्ये २३.६ मिमी, चोपड्यात २३ मिमी आणि अमळनेरमध्ये २२.९ मिमी पाऊस झाला आहे. भुसावळमध्ये २२.३, पाचोर्‍यात २१.६, धरणगावात २१.५, मुक्ताईनगरात २१.१, भडगावात २०.६, रावेरमध्ये १९.९ आणि यावलमध्ये १९.७ मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान, चाळीसगाव तालुक्यात केवळ १५.३ मिमी, तर पारोळा तालुक्यात सर्वात कमी ७.७ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही दमदार पावसाकडे लागल्या आहेत.

मंडळनिहाय पाहता, जामनेर तालुक्यातील तोंडापूर मंडळात तब्बल ७५.५ मिमी पावसाची नोंद झाली. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे ६०.१ मिमी, धरणगाव तालुक्यातील पाळधीत ५७ मिमी, अमळनेर तालुक्यातील भरवस येथे ५० मिमी, तर चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथे ३८.२ मिमी पाऊस झाला. अमळनेरच्या मारवड मंडळातही ३०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

एकीकडे काही भागांत पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळत असला, तरी जिल्ह्यात सर्वदूर समान पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांतील शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसांत पावसाची स्थिती कशी राहते, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT