Jalgaon Paldhi bypass accident |बायपास अजून किती बळी घेणार? २२ वर्षीय तरुणाचा कंटेनरखाली दबून मृत्यू

रॉंग साईडने अवजड वाहनांची वाहतूक सुरूच; सूचना फलकांकडे दुर्लक्षाचा आरोप
jalgaon paldhi bypass
jalgaon paldhi bypass
Published on
Updated on

जळगाव : पाळधी बायपासवर सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धरणगाव तालुक्यातील टाहाकळी फाट्याजवळ बुधवारी कंटेनर पलटी होऊन दुचाकीसह उभ्या असलेल्या करण जनार्धन सोनवणे (वय २२) या तरुणाचा कंटेनरखाली दबून जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर बायपास रस्त्याचे काम, वाहतूक नियोजन आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अपघाताच्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, काम सुरू असल्याची वाहनचालकांना पुरेशी पूर्वसूचना देणारे फलक, दिशादर्शक चिन्हे अथवा आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाहनचालकांना रस्त्यावरील कामाची माहिती वेळेत न मिळाल्याने कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो पलटी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

या दुर्घटनेनंतर संबंधित यंत्रणा आणि कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बायपास रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

एकेरी मार्गावरून दुतर्फा वाहतूक?

दरम्यान, तरसोद फाट्याकडून येणारी अवजड व मोठी वाहने रॉंग साईडने वळण घेऊन बायपासचा वापर करीत असल्याचे चित्र असल्याचा आरोप होत आहे. परिणामी, ज्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे, त्याच मार्गावरून प्रत्यक्षात दुतर्फा वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, चार-पाच दिवसांपूर्वी याच परिसरात कंटेनर आणि कारचा अपघात झाल्याची माहिती आहे. या घटनेत जीवितहानी झाली नसल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नाही. मात्र, एकेरी मार्गावर अवजड वाहनांची अशा प्रकारे वाहतूक सुरू राहिल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सूचना फलकांची जबाबदारी कोणाची?

रॉंग साईडने वळण घेणाऱ्या अवजड वाहनांमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेता संबंधित ठिकाणी पुरेसे सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे आणि वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामकाजाबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः रस्त्याच्या दुरुस्तीच्या ठिकाणी वाहनचालकांना पुरेशी पूर्वसूचना न मिळाल्यामुळेच करण सोनवणेचा बळी गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

एमडी, जीएमसह अधिकाऱ्यांवर गुन्हा; कारवाईत दिरंगाई का?

अपघातास रस्त्याची नादुरुस्ती आणि सुरक्षा उपायांतील निष्काळजीपणा थेट कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात 'ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि.' कंपनीचे एम.डी. शैलेंद्र सिंघल, जी. एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा रजि. क्र. २६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५ (सदोष मनुष्यवध), २९०, ३(५) सह मोटार वाहन कायदा कलम १९८-अ आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल होऊनही कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई का झालेली नाही? असे अनेक संतप्त सवाल नागरिकां कडून विचारले जात आहेत. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बायपासवरील सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्यक्षात कोणती कारवाई झाली? सूचना फलक का लावले गेले नाहीत? रॉंग साईडने होणारी अवजड वाहनांची वाहतूक का रोखली जात नाही? असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news