mobile tower  file photo
जळगाव

Jalgaon | मोबाईल टॉवरला गळती लावून डिझेल लंपास करणारा एलसीबीच्या जाळ्यात!

नशिराबाद परिसरातील तब्बल ९२० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; ४ गुन्हे उघडकीस, रोकडसह मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

jalgaon mobile tower diesel theft lcb arrest

जळगाव : मोबाईल टॉवर अखंड चालू राहावेत म्हणून ठेवलेल्या जनरेटरमधील डिझेलवर डल्ला मारणाऱ्या सराईत चोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. पूर्वी जिओ कंपनीतच काम करणाऱ्या समीर जानमोहम्मद तडवी (वय ३०, रा. अकलूद, ता. यावल) याने नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या चार टॉवर्समधून तब्बल ९२० लिटर डिझेल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून ६५ लिटर डिझेल आणि ५० हजार रुपयांची रोख जप्त केली असून चारही गुन्ह्यांची उकल केली आहे.

नशिराबाद परिसरातील जिओ टॉवरच्या जनरेटरमधून मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी / श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक कामाला लावले होते. टॉवरवर पूर्वी काम केलेल्या कर्मचाऱ्यांची कुंडली तपासताना दोन वर्षांपूर्वी डिझेल भरण्याचे काम करणाऱ्या समीर तडवी याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.

एलसीबी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे १५ सप्टेंबर रोजी अकलूद येथे छापा टाकून समीरला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला; मात्र खाक्या दाखवताच त्याने चारही ठिकाणी डल्ला मारल्याची कबुली दिली.

या चार ठिकाणी मारला डल्ला:

कडगाव रस्त्यावरील टॉवर: २३० लिटर

खिर्डी शिवार टॉवर: २३० लिटर

भादली रेल्वे गेटजवळील टॉवर: २२० लिटर

असोदा रोडवरील टॉवर: २४० लिटर

नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चारही गुन्ह्यांतून त्याच्याकडून ५० हजारांची रोकड आणि डिझेल जप्त करण्यात आले असून पुढील तपास नशिराबाद पोलीस करत आहेत. ही धडक कारवाई पोनि राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोउनि सोपान गोरे, दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, मिलिंद जाधव, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, अकरम शेख यांच्यासह पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT