विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. Pudhari
जळगाव

Jalgaon Mlc Election | गिरीश महाजनांचे प्रयत्न निष्फळ; जळगाव विधान परिषदेत शिंदे गटाची बंडखोरी कायम

भाजपसमोर आता अधिकृत लढतीसोबतच घरातील बंडखोरीचेही आव्हान

पुढारी वृत्तसेवा

Shinde Group Rebellion Jalgaon

जळगाव : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. महायुतीतील मतभेद उघड होत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनंतरही शिवसेना (शिंदे गट) समर्थित बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे भाजपसमोर आता अधिकृत लढतीसोबतच घरातील बंडखोरीचेही आव्हान उभे राहिले आहे.

निवडणुकीसाठी सुरुवातीला १६ उमेदवार मैदानात होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर बंडखोर उमेदवार आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, प्रवीण पाटील आणि सुनील उर्फ बंटी जंगले यांनी उमेदवारी मागे घेतली.

यानंतर दुपारच्या सत्रात शेख नुसार जावेद इकबाल, अब्दुल रशीद, निलेश झोपे, सलीम खान मणियार, हितेंद्र देशमुख आणि भुवनेश्वर पाटील यांनीही माघार घेतली. अखेरच्या क्षणी शिवसेना (शिंदे गट)चे बंडखोर दीपक धांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थक सचिन चौधरी यांनीदेखील आपले अर्ज मागे घेतले.

या घडामोडीनंतर आता निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार उरले आहेत. त्यामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शरद तायडे, शिवसेना (शिंदे गट) समर्थित अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा समावेश आहे.

महायुतीतील समन्वय राखण्यासाठी गिरीश महाजन यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. मात्र रेश्मा काळे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने शिंदे गटातील नाराजी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपला विरोधकांसोबतच मित्रपक्षातील असंतोषाचाही सामना करावा लागणार आहे. परिणामी ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची ठरण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नामनिर्देशन अर्ज माघारीच्या मुख्य कक्षात पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने माध्यम प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. दुपारी तीन वाजेपर्यंत पत्रकारांना बाहेरच थांबविण्यात आले. याबाबत पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT