POCSO Pudhari
जळगाव

Jalgaon POCSO Case: जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची दोन प्रकरणे; पोक्सोअंतर्गत गुन्हे

धरणगावात १६ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; जळगाव एमआयडीसीत १७ वर्षीय मुलीशी बालविवाह केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

धरणगाव: नात्यातील अल्पवयीन बालिकेला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धरणगाव तालुक्यातील खपाट येथे उघडकीस आला आहे. या पाशवी कृत्यातून पीडित १६ वर्षीय बालिका गर्भवती राहिली असून, धरणगाव पोलिसांनी नराधम आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत.

​मंगल गणसाराम महाले (वय ४३, रा. खपाट, ता. धरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी निकिता समाधान सोनवणे (वय २०, रा. खपाट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मंगल महाले याने फिर्यादीच्या चुलत नणंदेला (वय १६ वर्षे ६ महिने) ती अल्पवयीन असल्याचे ठाऊक असतानाही वेळोवेळी जाळ्यात ओढले. तिला जीवे मारण्याची धमकी देऊन खपाट गावाजवळील झेरी नाल्याकाठच्या झाडाझुडपांत नेऊन तिच्यावर बळजबरीने वारंवार लैंगिक अत्याचार केला.

​या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबाला जबर धक्का बसला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६१(१), ३५१(३) सह पोक्सो कायदा कलम ४ व ६ अन्वये गुन्हा (गु.रं.नं. ३२७/२०२६) दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून चोपडा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी भेट दिली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी आरोपी मंगल महाले याला शुक्रवारी रात्री अटक केली आहे.

जळगाव एमआयडीसी: अल्पवयीन मुलीशी बालविवाह करून शारीरिक संबंध; नराधम पतीविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही १७ वर्षीय मुलीशी जबरदस्तीने विवाह लावून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना धानवड (ता. जि. जळगाव) येथे समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बालविवाह व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भूषण अशोक मोरे (रा. धानवड, ता. जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, भूषण मोरे याने मुलगी अल्पवयीन असल्याचे पूर्ण ठाऊक असतानाही तिच्यासोबत विवाह केला. त्यानंतर तिला राहत्या घरी डांबून पती-पत्नीसारखे राहण्यास भाग पाडले आणि तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

​हे प्रकरण जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्यामार्फत ‘झिरो’ने वर्ग होऊन जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी भूषण मोरे याच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम ६४(२)(M), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४, ६ आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ६, ९ अन्वये गुन्हा (गु.रं.नं. ७६२/२०२६) दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील पुढील तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT