Jalgaon Crime : जळगावात निलंबित होमगार्डचा 'हातसफाई'चा धंदा; बसस्थानकातील जबरी चोरीचा छडा!

जिल्हापेठ पोलिसांचा दणका: भजी गल्लीतून ६० वर्षीय सराईताला बेड्या, १६ हजारांची रोकड जप्त
Jalgaon Crime : जळगावात निलंबित होमगार्डचा 'हातसफाई'चा धंदा; बसस्थानकातील जबरी चोरीचा छडा!
Jalgaon Crime : जळगावात निलंबित होमगार्डचा 'हातसफाई'चा धंदा; बसस्थानकातील जबरी चोरीचा छडा!
Published on
Updated on

जळगाव: नवीन बसस्थानक परिसरात भरदिवसा हाताला झटका मारून रोकड पळवणाऱ्या निलंबित होमगार्डच्या मुसक्या जिल्हापेठ पोलिसांनी आवळल्या आहेत. भिकन पंडीत शर्मा (वय ६०, रा. तलाव गल्ली, पारोळा) असे या सराईत चोरट्याचे नाव असून, पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत त्याच्याकडून १६ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.

नवीन बसस्थानकात १७ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी उभे असताना भिकन शर्माने त्यांच्या हातातील २१ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी १९ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार जिल्हापेठचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांनी विशेष तपास पथक कामाला लावले.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. संशयित आरोपी नवीन बसस्थानकाजवळील भजी गल्ली परिसरात घुटमळत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या म्हाताऱ्या भामट्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

खाकीचा बुरखा, गुन्हेगारीचा जुना इतिहास!

अटक करण्यात आलेला भिकन शर्मा हा पूर्वी होमगार्ड म्हणून कार्यरत होता, मात्र गैरकृत्यांमुळे त्याला निलंबित करण्यात आले होते. तपासात तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्याच्यावर आधीच तोतयागिरी आणि जबरी चोरीचे तब्बल ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या नेतृत्वात सपोनि अनिल वाघ, पोहेकॉ महेश महाजन, नरेश सोनवणे, तेजस मराठे, दीपक पाटील, प्रवीण जाधव, समाधान पाटील, प्रशांत लाड, कमलाकर बडगुजर आणि अजय आहिरे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news