Love marriage clash Jalgaon AI Photo
जळगाव

Jalgaon News: प्रेमविवाहानंतर तरुण-तरुणी पोहोचले पोलीस ठाण्यात; तिथेच नातेवाईकांचा तुफान राडा, खिडक्यांच्या काचाही फोडल्या!

Love marriage clash Jalgaon: प्रेमविवाह करून संरक्षणासाठी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तरुण-तरुणीच्या प्रकरणावरून दोन गटांमध्ये पोलिसांसमोरच मोठा राडा झाला.

मोहन कारंडे

Love marriage clash Jalgaon:

जळगाव : प्रेमविवाह करून संरक्षणासाठी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तरुण-तरुणीच्या प्रकरणावरून दोन गटांमध्ये पोलिसांसमोरच मोठा राडा झाला. शुक्रवारी जळगावमधील एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलगा आणि मुलगी असल्याची माहिती मिळताच दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली. आधी शाब्दिक चकमक आणि नंतर थेट पोलिसांसमोरच दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने संतप्त जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला.

नेमकं प्रकरण काय?

जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र दोन्ही कुटुंबीयांचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. त्यामुळे दोघेही काही दिवसांपूर्वी घरातून पळून गेले होते. त्यांनी एकमेकांच्या संमतीने विवाह देखील केला. कुटुंबीयांच्या विरोधात विवाह केल्याने भविष्यात कोणताही वाद होऊ नये, या कारणास्तव ते शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले.

थाटात आले, पोलिसांसमोरच भिडले, खिडक्यांच्या काचा फोडल्या

तरुण-तरुणी विवाह करून पोलीस ठाण्यात आल्याची माहिती दोन्ही कुटुंबीयांना मिळाली. त्यांनी याची माहिती आपआपल्या नातेवाईकांना आणि समर्थकांना देत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दोन्हीकडचे लोक धावतच पोलीस ठाण्यात जमले आणि त्यांच्यात या प्रेमविवाहावरून वादावादी सुरू झाली. थोड्याच वेळात दोन्ही गटांत मोठी खडाजंगी उडाली. धक्काबुक्की, मारहाण सुरू झाली. यामध्ये पोलीस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

राजकीय रंग मिळाल्याने वाद चिघळला

या घटनेला राजकीय रंग मिळाल्याने वाद आणखीनच चिघळला. कारण या राड्यात एकीकडे एका विद्यमान नगरसेवकाचा गट, तर दुसरीकडे एका माजी जिल्हा परिषद सदस्याचा गट आमनेसामने आला होता. घटनेची गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला. पोलिसांनी कडक भूमिका घेत दोन्ही गटांना शांत केले, तेव्हा कुठे तणाव निवळला.

तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार!

प्रेमविवाह केलेले तरुण-तरुणी दोघेही कायदेशीरदृष्ट्या सज्ञान (Adult) आहेत. त्यांनी परस्पर संमतीने विवाह केल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार त्यांना आवश्यक ते कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी पोलिसांनी माहिती दिली.

दरम्यान, पोलीस ठाण्यात झालेल्या तोडफोडीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तपासानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT