Illegal Weapon Seizure MIDC Police
जळगाव: एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली. आरोपीकडून सुमारे २० हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व मॅगझीन जप्त करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जळगाव विमानतळासमोरील कुरुंबा परिसरातून धनवडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी सापळा रचला.
संशयिताला थांबण्याचा इशारा केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून गणेश श्रावण सोनवणे (वय २४, रा. कुरुंबा, ता. जि. जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, जिन्सच्या पँटच्या मागील बाजूस कमरेला खोचलेला गावठी कट्टा (मॅगझीनसह) आढळून आला.पंचांसमक्ष शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या विशेष पथकाने केली.