Pudhari
जळगाव

Dead Fish Jalgaon | मन्यारखेडा तलावात हजारो किलो लहान-मोठे मासे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

हजारो किलो माशांचा मृत्यू; दूषित रासायनिक पाण्यामुळे प्रकार घडल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Manyarkheda Lake

जळगाव : जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. तलावात हजारो किलो लहान-मोठे मासे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शासनमान्य आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सैंदाणे यांनी सांगितले की, मन्यारखेडा तलावावर सुमारे ४० ते ४५ कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, एमआयडीसी परिसरातील १६ ते १७ रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले दूषित पाणी तलावात सोडले जात असल्याने जलप्रदूषण वाढत असून, त्याचाच परिणाम म्हणून हजारो किलो मासे मृत्यूमुखी पडल्याचा आरोप त्यांनी केला.

या घटनेमुळे तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मृत मासे साचले असून दुर्गंधी पसरली आहे. तसेच जलचर आणि पर्यावरणावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. माशांच्या मृत्यूमुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर संकट ओढवले आहे.

बाळासाहेब सैंदाणे यांनी सांगितले की, दूषित पाण्याचा प्रश्न २०१८ पासून प्रशासनाच्या निदर्शनास सातत्याने आणला जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कंपन्यांवर किंवा प्रदूषणाच्या प्रश्नावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी अशाच प्रकारे नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, संस्थेकडून शासनाकडे नियमित महसूल भरला जात असतानाही मन्यारखेडा तलावाच्या देखभालीसाठी किंवा नुकसानभरपाईसाठी कोणतीही शासकीय मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संबंधित रासायनिक कंपन्यांवर कठोर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

आमची आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था असून या तलावामुळे ४० ते ४५ कुटुंबांना रोजगार मिळतो. मात्र, एमआयडीसीतील १६ ते १७ कंपन्यांचे दूषित पाणी तलावात येत आहे. २०१८ पासून याबाबत सातत्याने तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी आमचे मोठे नुकसान होत आहे. शासनाकडे महसूल भरूनही कोणतीही मदत मिळत नाही. तलावाच्या देखभालीसाठीही शासनाकडून सहकार्य नसून यावेळी हजारो किलो मासे मृत्यूमुखी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
— बाळासाहेब सैंदाणे, अध्यक्ष, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT