Jalgaon News File Photo
जळगाव

Jalgaon News: शेतीच्या वादातून डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; गोणीत भरलेला मृतदेह बहुळा नदीतून काढला बाहेर

गोराडखेडा प्रकरणाचा एलसीबीकडून पर्दाफाश; गावातीलच दोन आरोपींना अटक

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon News

जळगाव : शेतीच्या व्यवहारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथून पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे आलेल्या ५० वर्षीय इसमाचा डोक्यात लोखंडी पाईपने जोरदार प्रहार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून बहुळा नदीत फेकून देणाऱ्या गोराडखेडा येथील दोन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तसेच, नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

कन्नड येथील व्यापाऱ्याचे अपहरण अन् घातपात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी संजय धनराज तेली (वय ५०) हे शेतीच्या व्यवहारासाठी पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे आले होते. मात्र, त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या मित्राने १८ नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले. एलसीबीच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गोराडखेडा येथील राहुल धर्मा पाटील (वय ४५) व संजय वामन भिल्ल (वय ५५) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या गुन्ह्याचा उलगडा झाला.

शेतीच्या वादातून मुख्य संशयित आरोपी राहुल पाटील याने संजय तेली यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर साथीदार संजय भिल्ल याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून बहुळा नदीपात्रात फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने बहुळा नदीत शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला आहे. या गुन्ह्यात आता खुनासह पुरावा नष्ट केल्याची वाढीव कलमे (१०३ (१), २३८, १४० (१), ३ (५), ३१५) लावण्यात आली आहेत.

या पथकाने केली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड, पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार, एलसीबीचे उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार लक्ष्मण पाटील, नाईक राहुल पाटील, कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, रतन गिते, ईश्वर पाटील, भूषण पाटील, चालक हवालदार बाबासाहेब पाटील, तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रदिप शेवाळे व हवालदार दिलीप वाघमोडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास सहायक निरीक्षक प्रदिप शेवाळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT