जळगाव येथे लखपती दीदी सन्मान कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक ५ मुद्दे  file photo
जळगाव

महिला सक्षमीकरण ते सुरक्षा...; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक ५ मुद्दे

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (दि.२५) जळगाव येथे लखपती दीदी सन्मान सोहळा (Lakhpati Didi Yojana) पार पडला. या अंतर्गत सुमारे ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमातून पंतप्रधान पाच हजार कोटी रुपये बँक कर्जाची रक्कम बचतगटांना दिली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रातील तसेच राज्यातील इतरही मंत्री उपस्थित होते. जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक ५ मुद्दे...

महिलांवरी अत्याचार अक्षम्य पाप

महिलांवरील अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असो, त्याला शिक्षा झाली पाहिजे. रुग्णालय असो किंवा शाळा असो पोलीस यंत्रणा किंवा कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा चालणार नाही. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र सरकार सातत्याने कायदे कडक करत आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार सोबत आहे, असे मोदी म्हणाले.

पोलंडच्या लोकांना महाराष्ट्रातील लोकांचा आदर

पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूप आदर करतात. राजधानीत कोल्हापूरचे स्मारक आहे. पोलंडच्या लोकांनी कोल्हापूरच्या लोकांच्या सेवाभाव आणि आदरातिथ्याचा सन्मान करण्यासाठी हे स्मारक बांधले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील हजारो माता आणि बालकांना कोल्हापूरच्या राजघराण्याने आश्रय दिला होता, असे मोदी यांनी सांगितले.

आधुनिक आणि नैसर्गिक शेतीसाठी महिला शक्तीला नेतृत्व

आज प्रत्येक गावात १.२५ लाखाहून अधिक 'बँक सखी' बँकिंग सेवा देत आहेत. आता आम्ही भगिनींना ड्रोन पायलटही बनवत आहोत, जेणेकरुन त्यांना ड्रोनद्वारे आधुनिक शेती करण्यात मदत होईल. आधुनिक शेती आणि नैसर्गिक शेतीसाठी आम्ही महिला शक्तीला नेतृत्व देत आहोत, त्यासाठी आम्ही कृषी सखी कार्यक्रम सुरू केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

'लखपती दीदी'मुळे गावाची अर्थव्यवस्था बदलत आहे

लोकसभा निवडणुकीच्या वेळी ३ कोटी बहिणींना लखपती दीदी बनवायची आहे, असे म्हटले होते. गेल्या १० वर्षात एक कोटी लखपती दीदी तयार झाल्या आणि गेल्या दोन महिन्यांत आणखी ११ लाख लखपती दीदी त्यांच्यात सामील झाल्या. लखपती दीदी बनवण्याची ही मोहीम केवळ बहिणी आणि मुलींसाठी पैसे कमवण्याची नाही तर संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्यांना सक्षम करणारी योजना आहे. यामुळे गावाची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी महायुती सरकारची गरज

यापूर्वी देशातील करोडो भगिनींच्या नावावर कोणतीही मालमत्ता नव्हती. बँकेकडून कर्ज घ्यावे लागले तर ते मिळू शकत नव्हते. अशा परिस्थितीत बहिणी कोणतेही छोटे काम करायचे असले तरी ते करू शकत नव्हत्या. त्यामुळे मोदी सरकारने महिलांच्या हिताचे एकापाठोपाठ एक निर्णय घेतल्याचे मोदी यांनी सांगितले. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार म्हणजे नोकरीची गॅरंटी आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या महायुती सरकारची महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी गरज आहे. येथील बहिणी महायुती सरकारला साथ देतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT