जळगाव : गेल्या काही वर्षांपासून कापसाला समाधानकारक दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात कापसाच्या पिकाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, जिल्ह्यात एकूण 1 लाख 10 हजार 919 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवडच झालेली नाही. निश्चित केलेल्या क्षेत्राच्या तुलनेत यंदा फक्त 80 टक्के पेरणी झाली असून 20 टक्के क्षेत्र पेरणीविना राहिले आहे.
कापूस उत्पादनासाठी ओळखला जाणारा जळगाव जिल्हा राज्यातील महत्त्वाचा कृषी जिल्हा आहे. पूर्वी कापसाला भाव मिळवण्यासाठी येथे अनेक आंदोलने झाली. मात्र, गेल्या 3-4 वर्षांपासून कापसाच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाला आहे. वस्त्रोद्योग खाते असलेल्या या जिल्ह्यात यंदाही परिस्थिती बदललेली दिसत नाही.
जामनेर, यावल, जळगाव आणि बोदवड तालुक्यांत सर्वाधिक घट झाली आहे. जामनेर तालुक्यात तब्बल 24,286 हेक्टर, यावलमध्ये 10,651 हेक्टर, जळगावमध्ये 11,115 हेक्टर आणि बोदवडमध्ये 7,053 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली नाही.