Jalgaon Traffic Congestion
जळगाव : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला कालिंका माता मंदिर ते खोटे नगर दरम्यानचा समांतर रस्ता आज अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. दरम्यान, या मार्गावरील मुख्य महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असल्याने आणि बायपासवरील आरओबी उड्डाणपुलाला हानी झाल्यामुळे भुसावळकडून येणारी संपूर्ण अवजड वाहतूक शहरातून वळवण्यात आली आहे. परिणामी, जळगावकरांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कालिंका माता मंदिर ते अजिंठा चौफुली या मार्गावर मुख्य रस्त्यालगत प्रशस्त सिमेंट-काँक्रिटचा समांतर रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, हा रस्ता अद्याप वाहतुकीसाठी प्रभावीपणे खुला करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी रस्त्यावरच गॅरेज सुरू केले असून दुरुस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून काही ठिकाणी अर्धवट कामांमुळेही अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकणारा हा पर्याय सध्या निष्प्रभ ठरला आहे.
जुन्या महामार्गावरून आधीच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असताना पावसाळ्यातच काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. एका बाजूनेच वाहतूक सुरू असल्यामुळे कालिंका माता मंदिर ते अजिंठा चौफुली या दरम्यान तासनतास वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नियोजनाअभावी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महापौरांचे कारवाईचे आश्वासन समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने कारवाईचे संकेत दिले आहेत.
"हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असला, तरी शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक सूचना दिल्या जातील. लवकरच हा रस्ता पूर्णपणे मोकळा करून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.— दीपमाला काळे, महापौर, जळगाव