Jalgaon Jewellery Shop Theft  Pudhari
जळगाव

Jalgaon Theft Case | जळगावात सराफा दुकानांतून हातचलाखीने दागिने लांबवणारा सराईत अकोल्यात गजाआड

एलसीबीची धडक कारवाई; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Jewellery Shop Theft

जळगाव : सराफा दुकानांमध्ये हातचलाखी करून सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अकोला येथून अटक केली. मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापानगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचे ४७.४८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मोहम्मद अली सय्यद याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२९/२०२६, तसेच बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ असे दोन गुन्हे दाखल होते. दोन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.

दरम्यान, आरोपी अकोला शहरात लपून बसल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तातडीने अकोला गाठून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ३२.४० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, हस्तगत करण्यात आली. तसेच बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या पत्नीकडून मिळालेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत ४ लाख ९५ हजार रुपये, पोलिसांनी हस्तगत केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, संदीप चव्हाण आणि रिजवान शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला. तांत्रिक तपासासाठी गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी सहकार्य केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT