Nachankheda Jogalkheda water supply issue AI Image
जळगाव

Jalgaon News | गाव तहानलेलं ठेवून पळवलं २० लाख लिटर 'सरकारी पाणी'! जामनेरमधील पाणी चोरीच्या 'महाघोटाळ्या'ने खळबळ!

नाचणखेडा-जोगलखेडा पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फोडली; तब्बल २ लाख ९ हजारांचे नुकसान; कनिष्ठ अभियंत्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल!

पुढारी वृत्तसेवा

Nachankheda Jogalkheda water supply issue

जळगाव : मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात जिल्हा पाण्यासाठी टाहो फोडत असताना, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा आणि जोगलखेडा येथील गावकऱ्यांच्या हक्काचे पाणी चोरून स्वतःचे शेत सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या एका शेतकऱ्याचा संतापजनक कारनामा उघडकीस आला आहे. शासकीय पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तब्बल ४ फूट खोल खोदून, ती कट करून गेल्या तीन महिन्यांत तब्बल २० लाख ७० हजार लिटर पाणी चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात या 'पाणी चोरी'ची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा आणि जोगलखेडा या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने लाखोली शिवारातून मुख्य जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीवरून गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, लाखोली शिवारातील शेत गट नं. ८३/अ चे मालक चेतन सुनील पाटील (चौधरी) (रा. नाचणखेडा, ता. जामनेर) याने स्वतःच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी थेट शासकीय यंत्रणेलाच चुना लावण्याचे ठरवले.

आरोपी चेतन पाटील याने जमिनीत सुमारे ४ फूट खोल गाडलेली शासकीय ४ इंची पीव्हीसी (PVC) पाईपलाईन खोदली. ती मधोमध कट करून त्यातून थेट स्वतःच्या शेतात बेकायदेशीर कनेक्शन घेतले.त्यामधून दररोज अंदाजे २३ हजार लिटर पाणी चोरत होता.

हा प्रकार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ ते १८ मे २०२६ असा तब्बल ३ महिने अविरतपणे सुरू होता.या कालावधीत चोरलेले एकूण पाणी २०,७०,००० लिटर (किंमत रु. २,०७,०००/-) पाईपलाईन तोडल्यामुळे झालेले नुकसान दोन हजार असे एकूण नुकसान २ लाख ०९ हजार रुपयाचे नुकसान केले.

या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होत असल्यामुळे नाचणखेडा आणि जोगलखेडा या दोन्ही गावांतील पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. ऐन उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. पाणी असूनही गावात टंचाई का भासते आहे? याचा शोध घेतला असता हा पाणी चोरीचा धक्कादायक 'जामनेर पॅटर्न' उघडकीस आला.

पाणी चोरीचा हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग जामनेरचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र सुपडू चौधरी (वय ३२, रा. कृष्णपुरम कॉलनी, जळगाव) यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर त्यांनी तात्काळ पहूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून २० मे रोजी आरोपी चेतन सुनील पाटील याच्याविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT