तरुणाने बिबट्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले  Pudhari
जळगाव

Jalgaon Leopard Attack | अंगावर धावून आला बिबट्या, तरुणाने दाखवले धैर्य; थरारक संघर्षानंतर वनविभागाकडे सुपूर्द

जामनेर तालुक्यातील शहापूर येथे बिबट्याने तरुण शेतकऱ्यावर अचानक हल्ला चढवला

पुढारी वृत्तसेवा

Jamner Leopard Attack

जळगाव : जामनेर तालुक्यातील शहापूर येथे बिबट्याने तरुण शेतकऱ्यावर अचानक हल्ला चढवला. मात्र, घाबरून न जाता या ' तरुणाने' प्राणाची बाजी लावत बिबट्याशी थेट दोन हात केले. अत्यंत अंगावर काटा आणणाऱ्या या झटापटीत स्वतः गंभीर जखमी झालेला असतानाही, या तरुणाने बिबट्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. या अद्भूत आणि थरारक धाडसामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या तरुणाचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश नाना डोंगरे (रा. शहापूर, ता. जामनेर) असे या घाम फोडणाऱ्या धाडसी तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मुकेश आपल्या शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याचा हल्ला इतका तीव्र होता की कोणाचाही थरकाप उडाला असता. बिबट्याने मुकेश यांना जखमी केले, मात्र रक्ताच्या धारा वाहत असतानाही मुकेश यांनी हार मानली नाही. त्यांनी जीवाचा आकांत करत बिबट्यालाच प्रतिआव्हान दिले आणि त्याच्याशी थेट कुस्ती सुरू केली.

पण मुकेश डोंगरे यांनी जखमी अवस्थेतही बिबट्यावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. त्यांनी बिबट्याला अक्षरशः जागेवरच खिळवून ठेवले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला जिवंत पकडून थेट वनविभागाच्या स्वाधीन केले. एका हिंस्त्र श्वापदाला अशा प्रकारे जिवंत पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी.

या जीवघेण्या लढाईत मुकेश डोंगरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामनेर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. एका शेतकऱ्याने बिबट्याला धूळ चारल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच, मुकेश यांच्या धाडसाची चर्चा आता जळगावच्या गल्लीबोळापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत चवीने चघळली जात आहे. 'जळगावचा शेतकरी फक्त संकटांशीच नाही, तर हिंस्त्र श्वापदांशीही लढू शकतो', अशीच प्रतिक्रिया आता सर्वसामान्यांमधून उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT