Ganja seizure Pudhari Photo
जळगाव

Jalgaon police raid cannabis farm | जामनेरच्या मालदभाडी शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

७ ते ८ फूट उंचीची गांजाची झाडे जप्त; पोलिसांची चाहूल लागताच संशयित शेतकरी फरार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदभाडी शिवारात शेतात बेकायदेशीरपणे लावलेल्या गांजाच्या पिकावर जामनेर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अचानक छापा टाकला. या कारवाईत सुमारे ३ लाख ३५ हजार ७५० रुपये किंमतीची १३ किलो ४३० ग्रॅम वजनाची गांजाची हिरवीगार झाडे मुळासकट जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांची चाहूल लागताच संशयित आरोपी शेतकरी घटनास्थळावरून पसार झाले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालदभाडी शिवारातील शेतकरी अनिल दगडू पाटील (रा. मालदभाडी, ता. जामनेर) याने स्वतःच्या मालकीच्या शेतात चोरट्या विक्रीच्या उद्देशाने अंमली पदार्थ असलेल्या कॅनाबिस वनस्पतीची (गांजा) बेकायदेशीर लागवड केल्याची खात्रीशीर माहिती जामनेर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मालदभाडी शिवारातील संबंधित शेतात छापा टाकला.

या कारवाई दरम्यान शेतात ७ ते ८ फूट उंचीची पाने, फुले आणि बोंडे असलेली ओली ताजी गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी वजन केले असता २५ हजार रुपये प्रति किलो या बाजारभावाने एकूण ३ लाख ३५ हजार ७५० रुपये किंमतीचा १३ किलो ४३० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल मुळासकट उपटून जप्त केला. पोलिसांचा ताफा शेताकडे येत असल्याचे पाहताच संशयित आरोपी अनिल पाटील शेतातून पसार झाला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राजेश विलास लहासे (ब.नं. १११३) यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल दगडू पाटील याच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS) कलम ८(ब), २०(अ) अन्वये गुन्हा रजि. नं. ५५२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंखे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळुंखे करत आहेत. ग्रामीण भागात थेट शेतातच गांजाची लागवड उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT