Child Marriage Case Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून अत्याचार; सहा जणांविरुद्ध गुन्हा

पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई; तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Jamner Child Marriage Case

जळगाव : जामनेर तालुक्यातील पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षे आठ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा विवाह लावून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे एका तरुणासोबत लग्न लावून देण्यात आले. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह लावून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नानंतर संबंधित तरुणाने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारामुळे ती गर्भवती झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच कुटुंबातील काही व्यक्तींनी पीडितेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये राजेंद्र भिका पाटील, जिभु बळीराम पाटील, समाधान बळीराम पाटील (सर्व रा. शेंदुर्णी, ता. जामनेर), भगवान प्रल्हाद देवरे, मंदाबाई भगवान देवरे आणि सचिन भगवान देवरे (सर्व रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT