Jalgaon Jamner House Burglaries
जळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी एकाच दिवशी चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी (दि. २७) जामनेर तालुक्यात दोन, तर बोदवड आणि धरणगाव येथे प्रत्येकी एक घरफोडी झाली. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे एरंडोल आणि धुळे येथील तीन संशयितांना अटक केली.
जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे शेतकरी वसंत मुरलीधर महाजन (६६) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख आणि सव्वाचार तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना सकाळी पावणेसात ते पावणेबारा वाजेदरम्यान घडली. नेरी दिगर येथील आशाबाई अमरसिंग माळी (४८) यांच्या घरातूनही चोरट्यांनी ६० हजारांचे सोने, २५ हजारांची चांदी आणि ३५ हजारांची रोकड, असा एक लाख २० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
बोदवड शहरातील दत्त कॉलनीत सागर सुभाष हिवराळे (३४) यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि ३५ हजारांची रोकड असा ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला.
धरणगावच्या हेडगेवार नगरातील आकाश बाळू तायडे यांच्या घरातून ३३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी पोलिसांनी शाकीब दाउद शेख (१८), अश्पाक शेख मुस्ताक शेख (१९) आणि इम्रान शेख फिरोज शेख (१९) यांना अटक केली. उर्वरित घरफोड्यांचा तपास सुरू असून, भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.