जळगाव- चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ रस्त्यावर कारवाई करून तीन गावठी कट्टे आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे, काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लासूर गावाच्या पुढे नाटेश्वर मंदिराजवळ सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी मोटारसायकलवरून गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता, तिघांच्या ताब्यात तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल आढळून आली.
या कारवाईत साहील दगडू आवारे (वय १९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पिंपरी-चिंचवड), सौरभ संतुराम मोतीरावे (वय २३, रा. पिंपरी-चिंचवड) आणि रोहित चंद्रकांत जुजगर (वय ३०, रा. पार्वती कॉम्प्लेक्स, मेहतर वस्ती, मारेवस्ती, चिखली, ता. हवेली, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीचे तीन गावठी कट्टे, आठ हजार रुपये किमतीची आठ जिवंत काडतुसे आणि ५० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल यांचा समावेश आहे.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९३/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३/२५, ७/२५, भारतीय न्याय संहितेचे कलम ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. पोलीस निरीक्षक संजय जयराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.