

जळगाव - बाजार करून पायी जाणाऱ्या महिलेला ‘घरी सोडतो’ असा बहाणा करून रिक्षेत बसवले आणि काही क्षणातच गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पलायन केले. भुसावळात घडलेल्या या धक्कादायक जबरी चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. नशिराबाद परिसरातील एका हॉटेलजवळ सापळा रचून पोलिसांनी तीन सराईत भामट्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संशयित आरोपी हे नशिराबाद परिसरातील मुकेरिया हॉटेलजवळ थांबलेले असल्याची पक्की खबर मिळताच पथकाने छापा टाकला. पोलिसांनी १) वसिम शेरअली तेली (वय ३८, रा. फातेमा नगर झोपडपट्टी, एमआयडीसी, जळगाव), २) अरबाज खान अय्युब खान (वय २६, रा. शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि ३) वसिम अजमल खान (वय ३६, रा. साती मजार, नशिराबाद) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता भुसावळात बाजार करून दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिराजवळून पायी जात होत्या. त्यावेळी एक तीनचाकी रिक्षा त्यांच्याजवळ येऊन थांबली. रिक्षाचालकाने “तुम्हाला घरी सोडतो” असे गोड बोलून महिलेला विश्वासात घेत मागे बसवले. मात्र, रिक्षेत आधीच दबा धरून बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यावर झडप घालून सुमारे २५ हजार रुपये किमतीची २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा (गु.र.नं. २००/२०२६, बीएनएस कलम ३०९ (४), ३(५)) दाखल करण्यात आला होता.
एलसीबीची चक्रे फिरली; मुकेरिया हॉटेलजवळ आवळल्या मुसक्या
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषणासह गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.
रिक्षासह सोन्याची पोत हस्तगत
आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडेण व काळे मणी असलेले मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली १ लाख रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा क्रमांक एम एच 19 व्ही 6563 असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. यातील मुख्य आरोपी वसिम शेरअली तेली याच्यावर एमआयडीसी व रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरी व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर वसिम अजमल खान याच्यावरही एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांच्या पथकाने बजावली.