Gulabrao Patil  Pudhari
जळगाव

Gulabrao Patil | "मी भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते” : गुलाबराव पाटील

दूध विकास संघाचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय जे. टी. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुढारी वृत्तसेवा

Gulabrao Patil BJP Remark

जळगाव : “त्या काळातील सहकार क्षेत्रात सर्वच माणसे साधी-भोळी होती. रमेशभाऊ तीन वेळा आमदार राहिले आणि सहकार क्षेत्रातही चेअरमन झाले. त्यावेळी सगळेच भोळे होते. मात्र मी भोळा नाही. मी जर भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते,” असा मिश्कील राजकीय टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.

दूध विकास संघाचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय जे. टी. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जे. टी. महाजन यांच्या साधेपणाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.

जे. टी. महाजन यांच्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, “आम्ही लहान असताना जे. टी. महाजन यांना पाहायचो. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांना पाहिल्यावर एखादा शेतकरीच आपल्यासमोर आला आहे, असे वाटायचे. आज एका शेतकऱ्याच्या पुतळ्याचे अनावरण एका शेतकरी पुत्राच्या हस्ते होत आहे, याचा मला अभिमान आहे.”

सहकार क्षेत्रातील आपल्या प्रवासाबाबत पाटील म्हणाले, “मी सुरुवातीला सहकार क्षेत्रात काम करणारा नव्हतो. मात्र पवार आणि चिमणराव यांच्यामुळे या क्षेत्रात उभा राहिलो. सहकार क्षेत्रात काम करताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून सही करावी लागते. मी स्वतःसाठी काही घेत नाही. शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांचा हा विश्वास जपला पाहिजे.”

संस्था नीट चालवण्याची जबाबदारी

“सत्तेत राहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे सत्तेची निष्ठा राखून संस्था नीट चालवल्या पाहिजेत. केवळ कार्यक्रम करून उपयोग नाही. जनतेने आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या संस्था व जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत. आपल्या भागातील अनेक कारखाने बंद आहेत; मात्र खासगी कारखाने जोरदारपणे सुरू आहेत. जनतेने दिलेल्या संस्था नीट सांभाळल्या, तर सरकारही मजबूत राहील,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

दूध विकास संघाच्या कामकाजाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “एक तुकाराम मुंडे आले आणि इकडे दुधाची आवक वाढली. आता पनीरही सापडत नाही, एवढी मागणी निर्माण झाली आहे. हा केवळ कार्यक्रम नसून कौटुंबिक सोहळा आहे.”

जे. टी. महाजन यांच्या साधेपणापासून सहकार क्षेत्रातील योगदानापर्यंतच्या आठवणींना उजाळा देत पाटील यांनी दूध विकास संघाने भविष्यातही शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखून काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT