जळगाव : शहराला लागून असलेल्या खेडी हुडको परिसरातील सोळा वर्षीय मुलगी घरी उशिरा आल्याच्या कारणावरून वडिलांनी रागावल्याने आणि किरकोळ मारहाण केली. याचा राग मनात धरुन अल्पवयीन मुलगी प्रज्ञा रवींद्र शिंदे (वय १६, रा. खेडी हुडको परिसर, जळगाव)हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी, १९ जून रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. शनी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील खेडी हुडको याठिकाणी राहणारे प्रज्ञाचे वडील रवींद्र शिंदे हे सेंqQ´>गचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना पत्नी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. बुधवार, १८ जून रोजी सकाळी प्रज्ञा घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली होती. रात्री ८ वाजता ती घरी परतल्यानंतर वडिलांनी तिला उशिरा येण्याबद्दल विचारले आणि किरकोळ मारहाण करत रागावले.
याचा राग आल्याने प्रज्ञा पुन्हा घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेली. त्यानंतर तिने राहत असलेल्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या बैठक हॉल जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी, १९ जून रोजी दुपारी १२ वाजता हा प्रकार समोर आला. त्यानंतर प्रज्ञाच्या नातेवाईकांसह शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कविता कमलाकर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मुलीचा मृतदेह पाहताच तिच्या आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
या घटनेबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रज्ञाच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.