रामानंदनगर पोलिसांनी पाच संशयितांना अटक करण्यात आली  Pudhari
जळगाव

Jalgaon Crime | जळगावात ३५ लाखांच्या सुपारीचा गँगवारचा कट उधळला; पाच जणांना अटक

चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे आणि ६२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त; मुख्य सूत्रधारांसह चौघांची गुन्ह्यात वाढीव नोंद

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Gang War

जळगाव : जळगाव शहरात संभाव्य गँगवार घडवून आणत हत्याकांड करण्याचा कट रामानंदनगर पोलिसांनी उधळल्याचा दावा केला आहे. भुसावळ येथील काही गुन्हेगारांना लक्ष्य करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे, ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ, धारदार शस्त्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांना लक्ष्य करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. यापैकी पाच लाख रुपये आगाऊ दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री मिथुन बारसे आणि क्रिश बारसे हे जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यासह त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा कट आखण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

पिंप्राळा परिसरात पोलिसांचा सापळा

रामानंदनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ११ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्क मिलसमोरील मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला. यावेळी इनोव्हा कारवर छापा टाकून पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अटक केलेल्यांमध्ये खुशाल गजानन बोरसे (रा. खडकारोड, भुसावळ), संदीप बबन लोढे (रा. वाघनगर, जळगाव), राणू ऊर्फ ओमकार भदरगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे), अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशिम) आणि सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर) यांचा समावेश आहे.

भाड्याच्या खोलीत शस्त्रांसह एमडी ड्रग्ज

अटक केलेल्या संशयितांची चौकशी केली असता, त्यांनी जळगाव तालुक्यातील उमाळा येथे एक खोली भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या खोलीची झडती घेतली. तेथे आणखी दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, विक्रीसाठी ठेवलेले ६२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ आणि इलेक्ट्रिक वजनकाटा आढळून आला.

या मुद्देमालाची किंमत दोन लाख २२ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे हत्येच्या कथित कटासोबतच अंमली पदार्थांच्या व्यवहाराचाही तपास सुरू झाला आहे.

मुख्य सूत्रधारांसह चौघांची गुन्ह्यात वाढीव नोंद

या प्रकरणात बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर आणि रवी होळकर यांची आरोपी म्हणून वाढीव नोंद करण्यात आली आहे. बंटी आणि शिव पथरोड यांच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, जप्त केलेली शस्त्रे आणि अंमली पदार्थ कोणत्या कारणासाठी वापरले जाणार होते, तसेच सुपारी देण्याच्या कथित व्यवहारामागे आणखी कोण आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वेळीच कारवाई केल्यामुळे संभाव्य हत्याकांड टळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT