Raver Ganesh Visarjan Dispute
रावेर : गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुस्लिम वस्तीतून जाण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना रविवारी (दि. २० ) आंबेडकरनगर परिसरात घडली. या घटनेत महिलांसह चौघांना दगड लागून दुखापत झाली. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात १४ जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास विशाल दशरथ घेटे हे काही लहान मुलांसह रिक्षातून घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी रजा कॉलनीमार्गे जात होते. त्यावेळी काही व्यक्तींनी रिक्षाचा मार्ग अडवून गणेशमूर्ती घेऊन या मार्गाने विसर्जनासाठी जाऊ नये, असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लता घेटे व अन्य साक्षीदार घटनास्थळी गेले. त्यावेळी दोन्ही गटांमध्ये वाद वाढला. त्यानंतर काही जणांनी जमाव करून दगडफेक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दगडफेकीत दिपाली विशाल घेटे, सरला कैलास घेटे, रुपाली शुभम घेटे आणि संध्या ज्ञानेश्वर घेटे या चौघी जखमी झाल्या. त्यांच्या हात, चेहरा, छाती आणि पायाला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी शेख जमील शेख उस्मान, इब्राहीम इरफान शेख, उमर शेख, रईस मांडा हॉटेलवाला, इरफान, मोईन रईस मांडा हॉटेलवाला, शेख सईद उर्फ लंगडा उर्फ सागर, शेख बिलाल खाँ युसुफ खाँ, कामील शागील किराणा दुकानवाला, शेख समील शेख सईद, आझम आरिफ मोहम्मद, सय्यद जाबील अली, शेख शफिक, शेख कासीम शेख जमील आणि सायरा बी यांच्यासह दोन-तीन अनोळखी महिला तसेच चार-पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३(१)(r), ३(२)(va) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमांन्वये कारवाई सुरू केली आहे.
फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.