Jamner Farmer Loss
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या कडाक्याच्या उन्हामुळे आगीच्या घटनांनी रौद्ररूप धारण केले आहे. जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत जामनेर, यावल आणि पारोळा तालुक्यात झालेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचे सुमारे ५, ८५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास आगीने हिरावल्याने बळीराजा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे.
जामनेर तालुक्यातील रांजणी शिवारात ६ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विनोद जगदेव मगरे यांच्या शेतात अचानक आग लागली. या आगीत साठवून ठेवलेली सुमारे ६० क्विंटल ज्वारीची गंजी पूर्णपणे जळून खाक झाली. यात मगरे यांचे अंदाजे १,२०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. फत्तेपूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद केली असून पोना सचित्तानंद अहिरे तपास करत आहेत.
यावल तालुक्यातील बामणोद शिवारात चंद्रकांत भागवत तळेले यांच्या शेतात ७ मे रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत पत्नीच्या नावावर असलेल्या शेतातील ४,५०० केळीची झाडे (पिलबाग) आणि ठिबक सिंचनाच्या नळ्या जळाल्या. यामध्ये ठिबकचे १,२५,००० रुपये आणि केळीचे ४०,००० रुपये असे एकूण १,६५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात सफौ संतोष चौधरी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
पारोळा तालुक्यातील बोळे शिवारात २३ एप्रिल रोजी झालेली घटना उशिराने समोर आली आहे. शेत गट क्रमांक १४९/१ मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही आग शेजारील चंद्रकला अशोक पाटील आणि यशवंत भावराव पाटील यांच्या शेतात पसरली. यात कापून ठेवलेला सुमारे १४० क्विंटल मका आणि ठिबक नळ्या जळून खाक झाल्या. या घटनेत अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ७ मे रोजी पारोळा पोलीस ठाण्यात यशवंत पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.