

जळगाव : पतीच्या दारूच्या व्यसनामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून, एका ४५ वर्षीय महिलेने आपल्या पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भारत पाटील (वय ५०) असे मयत पतीचे नाव आहे. भारत पाटील यांना दारूचे व्यसन होते आणि त्यापायी त्यांनी स्वतःवर कर्जाचा डोंगर करून ठेवला होता. घरातील सर्व जबाबदाऱ्या पत्नी मनीषा भारत पाटील (वय ४५) यांच्या खांद्यावर होत्या. दारूच्या नशेत अवस्थेत पतीकडून होणारा सततचा शारीरिक व मानसिक त्रास आणि संसाराची होणारी फरफट यामुळे मनीषा अत्यंत वैतागली होती. याच वैफल्यातून तिने रात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या पतीचा दोरीने गळा आवळून जीव घेतला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी (पोस्टमॉर्टम) पाठवला. सुरुवातीला या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात भारत पाटील यांचा मृत्यू गळा आवळल्याने आणि श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपी मनीषा पाटील हिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पतीने छळ केल्यानेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी मनीषा हिला तात्काळ अटक केली असून, जळगाव शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.