Jalgaon FDA Action 
जळगाव

Jalgaon FDA Action|जळगावकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना 'एफडीए'चा दणका: ६ दुकानांचे परवाने निलंबित, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या; ३४ जणांना बेड्या, ६७ लाखांचा माल आणि ८ वाहने जप्त

पुढारी वृत्तसेवा

​जळगाव: जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या भेसळखोर व अस्वच्छ व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जोरदार कारवाईचा बडगा उचलला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत विभागाने जिल्ह्यात धडक मोहिमा राबवत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

​२१ नमुने अप्रमाणित; भुसावळच्या परवानाधारकाचे पनीर अहवालाला आव्हान

जिल्ह्यात सध्या २,१३९ परवानाधारक तर २७,६३१ नोंदणीधारक व्यावसायिक कार्यरत आहेत. तपासणी मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षेचे नियम आणि स्वच्छतेचा फज्जा उडवणाऱ्या ६ आस्थापनांचे नोंदणी परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत.

प्रयोगशाळा तपासणीसाठी घेतलेल्या ४०७ अन्न नमुन्यांपैकी ६६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे ४२ नमुने प्रमाणित तर तब्बल २१ नमुने थेट अप्रमाणित (भेसळयुक्त/असुरक्षित) आढळून आले आहेत. यात प्रामुख्याने दूध, पनीर, खाद्यपदार्थ आणि शीतपेयांचा (कोल्ड्रिंक्स) समावेश आहे. दरम्यान, भुसावळ येथील एका परवानाधारकाने पनीर 'अनसेफ' आल्याच्या अहवालाला कायदेशीर आव्हान (चॅलेंज) दिले आहे.

​कारवाईचा धडक ताळेबंद, ​६०३ तपासण्या अन् लाखांचा दंड

जिल्ह्यातील ६०३ प्रतिष्ठानांची कसून तपासणी करण्यात आली. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३६ छोट्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून ८ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच त्रुटींची पूर्तता करण्याचे कडक निर्देश देण्यात आले.

४७ ठिकाणी छापे, २४ लाखांचा साठा जप्त

विभागाने ४७ ठिकाणी थेट छापे टाकून २३ लाख ९८ हजार ५५३ रुपयांचा संशयास्पद साठा जप्त केला. यामध्ये खुले खाद्यतेल, भेसळयुक्त दूध, खवा, शीतपेये आणि पॅकेज्ड ड्रिंक वॉटरचा समावेश आहे.

गुटखा तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक

बंदी असलेल्या गुटख्याची चोरटी वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर ३४ मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत ६७ लाख ३१ हजार ५९२ रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३४ तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तस्करीत वापरण्यात आलेली ३६ लाख २० हजार रुपये किमतीची ८ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. ​भेसळखोर आणि अस्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या अन्न व्यावसायिकांची गय केली जाणार नसून, ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल, असा सज्जड इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT